पावनखिंड 15

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

🔰 *भाग : १५* 🔰

दोनप्रहर सरत असता बाजी प्रभूंचं बांदल अश्वदळ दौडत गडाच्या पायथ्याशी आलं. बाजी प्रभूंच्या संगती तात्याबा म्हसकर, यशवंत जगदाळे, बाजींचे थोरले बंधू फुलाजी आणि बाजींचे दोन मुलगे महादजी व अनाजी होते. गडाच्या पायथ्याशी सारे पायउतार झाले. गडाच्या पायथ्याशी बैलगाड्यांचा तळ पडला होता. काबाडीच्या बैलांवरून सामान उतरलं होतं. गाडीतळावर पाच-दहा मोठ्या छपऱ्या उभारल्या होत्या.

बाजींचं अश्वपथक येताच सेवक धावले. सारे पायउतार होताच सेवकांनी घोडी ताब्यात घेतली. खालच्या तळाकडं आणि गडाकडं नजर टाकत बाजी म्हणाले,

‘तात्याबा! बाबाजीनं खूप कामगिरी केली. राजांनी भरपूर रसद पाठविलेली दिसते.’

‘राजे बोलतात, ते करतात.’ तात्याबा म्हणाला, ‘चला, गड गाठू या.’

यशवंत पुढं झाला.

बाजींनी यशवंतकडं पाहताच तो म्हणाला,

‘मी गडाखाली थांबू?’

‘का?’ बाजींनी सवाल केला.

यशवंत क्षणभर घुटमळला.

‘न्हाई! रसद वर जातीया, तवा….’

‘यशवंता, तुला पुष्कळ काम आहे. रसद येईल वर. त्याची काळजी नको. चल.’

यशवंत काही बोलला नाही. तो बाजींच्यासह गड चढू लागला.

गडाच्या प्रथम दरवाज्यात बाजींच्या स्वागतासाठी विठोजी उभा होता. मांडा-चोळणा घातलेला पगडीधारी विठोजी किल्लेदार शोभत होता

सर्वांत पुढं बाजी होते. मागून सर्व मंडळी येत होती.

बाजींची ती धिप्पाड उंचीपुरी किंचित उग्र मूर्ती पाहून विठोजी पुढं झाला आणि त्यानं बाजींना मुजरा केला.

त्या मुजऱ्याचा स्वीकार करीत विठोजीवर नजर रोखत बाजींनी विचारलं,

‘विठोजी किल्लेदार ना?’

‘जी!’

‘आमच्या माणसांनी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही?’

‘जी, न्हाई! त्यांनीच गड सजवला.’

‘अजून सजवला नाही. सजवायचा आहे.’ बाजींनी उत्तर दिलं.

पण विठोजीचं लक्ष बोलण्याकडं उरलं नव्हतं. बाजींच्या मागून येणाऱ्या यशवंतकडं त्याचं लक्ष खिळलं होतं. त्याला पाहून विठोजीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता प्रगटली होती.

यशवंत पुढं झाला आणि त्यानं विठोजीला वाकून नमस्कार केला.

विठोजी म्हणाला,

‘औक्षावंत व्हा!’

‘तुम्ही याला ओळखता?’ बाजींनी आश्चर्यानं विचारलं.

‘जावयाला कोन वळखनार न्हाई?’ विठोजी म्हणाला.

‘आमचा यशवंता तुमचा जावई?’ फुलाजींनी विचारलं.

‘व्हय!’

बाजी हसले. यशवंतच्या पाठीवर थाप मारीत म्हणाले,

‘काय, यशवंतराव! तरीच गडावर यायची टंगळ-मंगळ चालली होती, होय? विठोजी, आता तर तुम्ही मुळीच परके राहिला नाही. यापुढं गडाला जावईगडच म्हणायचं.’

सारे हसले.

गडात येताच बाजी गड निरखीत होते.

बाजी विठोजीच्या घरी पोहोचले. बाजी येणार, म्हणून पुढचा सोपा बैठकीनं सजला होता.

बाजी बैठकीवर बसले.

विठोजी म्हणाला,

‘धनी! तुमी आलासा, बेस झालं. आता ह्यो गड आनि तुमी हवं ते करा.’

‘म्हणजे?’ बाजींनी विचारलं.

‘लई कट्टाळा आला. धा वर्सांत गडाचे धा मालक झाले. दोन वेळच्या जेवणाची काळजी पडली. गडाखाली चार बिघं जमीन हाय. मी ऱ्हानार गडावर, आनि शेत कोन करनार? तवा गडाखाली जाऊन शेतात घरटं बांधून ऱ्हावं, म्हनतो.’

‘व्वा,’ बाजी म्हणाले, ‘असं होणार असतं, तर आम्ही गडावर आलो नसतो. तुम्ही गडकरी. तुमच्यासाठी तर राजांनी आम्हाला पाठवलं. शिवाजी राजांच्या राज्यात माणसं बेघरदार होत नसतात. आता गड सजेल; गडकऱ्यांचा वाडा उभा राहील. अंबरखाने उठतील. गडाच्या मुलखाची चौथाई वसूल करण्याचा अधिकार राजे तुम्हाला देतील. गडावर शिबंदी ठेवून मुलूख राखण्याचं काम तुमचं! ऐन लढाईच्या वेळी शिलेदार पळून गेला, म्हणतील तुम्हाला.’

‘म्या; आनि पळून जानार!’ आपल्या मिशीवरून पालथी मूठ फिरवीत विठोजी म्हणाला, ‘ते म्या कशाला सांगू? जेध्यांच्या संगती गड भांडवलाय् म्या. त्या जेध्यांना इचारा, म्हनावं’

‘ते माहीत आहे, विठोजी!’ तात्याबा म्हणाला, ‘आता माघारी वळू नगंस.’

‘येवढं सांगितलासा, आनि मागं वळंन व्हय?’ विठोजी हसून म्हणाला.

‘पण आमचे यशवंतराव गेले कुठं?’ बाजी म्हणाले.

आणि त्याच वेळी यशवंता घरातून बाहेर आला. त्याच्याकडं पाहून बाजी म्हणाले,

‘यशवंतराव, हे चालायचं नाही. तुम्ही सारखं चुलीपुढं जाऊन बसू लागलात, तर गड वसवणार कोण?’

यशवंत त्या बोलण्यानं संकोचला. विठोजी म्हणाला,

‘पन आमचं जावई तुमांस्नी गावालं कसं?’

‘आमास गावलं नाहीत. त्यांनी आमाला पकडलं.’ बाजी मोठ्यानं हसून म्हणाले, ‘तुमचे जावई एक दिवशी आमच्या वाड्यात आले. धारकरी म्हणून ऱ्हातो, म्हणाले. आम्ही त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. पट्टे घालून खेळू लागलो… आनि तुमच्या जावयानं आमच्या हातावर पट्ट्याचा वार केला.’

घराच्या आतल्या बाजूनं काकणांचा आवाज आला.

विठोजीची मुद्रा गंभीर झाली. तो उद्गारला,

‘अरारा! असं करायला नगो व्हतं.’

बाजी म्हणाले,

‘तसं केलं नसतं, तर तुमचे जावई आमच्याकडं शिलेदार बनले नसते. पोरात धमक आहे. हातात कसब आहे.’

‘पोराचं नशीब!’ विठोजी म्हणाला, ‘निजामशाहीत गुणाजी आनि आम्ही मैतर. शहाजी राजांच्या चाकरीला व्हतो. त्याला पोरगा झाला. मला पोरगी झाली. पुढं सगळंच दीस फिरलं. पन गुणाजी फिरला न्हाई. त्यानं पोरगीला मागणी घातली. नारळ-पोरगी पदरात घेतली.’

‘आम्हांला त्या गुणाजीला पाहायचं आहे.’ बाजींनी आज्ञा दिली, ‘तात्याबा, त्या तुमच्या गुणाजीला गडावर बोलवून घ्या.’

‘पन त्याचा एक पाय अधू हाय!’ तात्याबा म्हणाला.

मग त्याच्याकरता डोली पाठवा. विठोजी, गुणाजी गडावर आले, तर चालेल ना?’

‘हे काय इचारनं झालं?’ विठोजी म्हणाला.

समोर आलेलं गूळपाणी घेऊन बाजी उठत म्हणाले,

‘आता बसायचे दिवस संपले. गड तातडीनं उभा करायला हवा. चला, गड बघू.’

बाजी सर्वांसह गडाचं पठार फिरत होते. गडाचा परिसर बराचसा स्वच्छ झाला होता. गडावर अनेक ठिकाणी जुन्या वास्तूंची जोती जीव धरून होती. त्यांच्यावरची झाडं-झुडपं तोडल्यानं, त्यांच रूप नजरेत येत होतं. अनेक ठिकाणी काळ्या-भोर कातळाचे उंचवटे दिसत होते. त्यांकडं पाहून बाजींना समाधान वाटत होतं. ते फुलाजींना म्हणाले,

‘गड सजवणं फारसं कठीण नाही. हे कातळ फोडले, तरी भरपूर दगड मिळतील.’

गड निरखीत सारे पाण्याचा टाक्याजवळ आले.

पाण्याचं टाकं सुरेख बांधलं होतं. चारी बाजूंनी पायऱ्या होत्या. निळंभोर स्वच्छ पाणी नजरेत येत होतं.

बाजींनी शंका विचारली,

‘विठोबा, आता गडाचं बांधकाम सुरू होणार. हे पाणी पुरंल?’

‘पुरंल?’ विठोजी म्हणाला, ‘पुरून उरंल! केवढाबी उपसा करा, दुसऱ्या दिवशी पानी व्हतं तेवढंच ऱ्हातंय. आनि याशिवाय गडावर दुसरं टाकं हाय. तेबी असंच हाय. निजामशाहीच्या वख्ताला गाळ काढाय पायी बारा मोटा लावल्या व्हत्या. पन पानी तसूभर हललं न्हाई.’

‘ठीक! विठोजी, उद्यापासून गडाची कामगिरी सुरू करा. देवीला नारळ द्या. प्रथम तिचं देऊळ उभा करू. मग तटाची कामगिरी हाती घेऊ.’

बाजींच्या डोळ्यांसमोर पुढं सजणाऱ्या गडाचं चित्र रेंगाळत होतं. ते चित्र पाहत कुणाशी काही न बोलता बाजी आपल्या निवासाकडं परतले.

जासलोड गडाची उभारणी सुरू झाली. गुणाजी डोलीतून गडावर आला. त्याच्या बरोबर त्याचा कबिलाही होता. विठोजी, तात्याबा आणि गुणाजी यांची संगत जमली. तिघं एका वयाचे. विठोजीचं घर आनंदानं भरून गेलं. बाजींच्याबरोबर विठोजी, तात्याबा आणि कुबडी घेतलेला गुणाजी गडावर फिरत होते. गडाच्या उभारणीची स्वप्नं रंगवत होते.

एके दिवशी बाजींनी गुणाजीला सांगितलं,

‘गुणाजी, तुम्ही जाणती माणसं. राजांनी ही जोखीम टाकली, ती तुम्ही निस्तरायला पाहिजे. आता गड पुरा झाल्याखेरीज गडाखाली कुणी उतरायचं नाही.’

‘पण शेतीवाडी, घरदार…’

‘ती काळजी आम्ही घेऊ. गड पुरा झाल्याखेरीज गडाखाली उतरू नका, अशी राजांनी आज्ञा केली आहे. तेच आम्ही तुम्हांला सांगतो.’

गुणाजी, तात्याबा, विठोजी एकमेकांकडं पाहत असता बाजी तेथून केव्हा दूर गेले, हेही त्यांना कळलं नाही.

तात्याबा म्हणाला,

‘कायबी म्हना! ह्यो बाजी लई बेरका! बघता-बघता जाळ्यात गोवलं, नव्हं?’

 

 

*🚩 क्रमशः 🚩*