पावनखिंड 5

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

🔰 *भाग : ०५* 🔰

राजगडावर शिवाजीराजांच्या सदरेत, राजांचे खासे लोक गोळा झाले होते. त्यांत नेताजी पालकर, गोदाजी जगताप, वाघोजी तुपे, हिरोजी हिंगळे, सिदोजी पवार, महाडिक, मालुसरे, मोरोपंत ही मंडळी नजरेत येत होती. शिवाजीराजे आपल्या आसनावर बसले होते. राजांचे दिवाण शामराज नीळकंठ, बांदलांचा खलिता वाचत होते. शिवाजीराजांचा खलिता घेऊन गेलेले आबाजी विश्वनाथ राजांच्या शेजारी उभे होते. आबाजी विश्वनाथ हे राजांच्या अनेक हेरांपैकी एक हेर.
बांदलांचा खलिता वाचून होताच राजांच्या मुखावर स्मित उमटलं. ते म्हणाले,
‘ठीक आहे ! जगदंबेची इच्छा ! आम्ही सामोपचारानं माणसं गोळा करू पाहतो आणि ही माणसं वाकड्यात शिरतात. बांदल सांगतील, ते ऐकायलाच हवं. उद्या जायचं, ते आजच जाऊ !’
राजांचा तो निर्णय ऐकून साऱ्यांच्या चेहऱ्यांवर उत्साह प्रगटला.
राजांचं लक्ष आबाजी विश्वनाथाकडं गेलं.
त्यांनी विचारलं, ‘आबाजी, रोहिड्याची काय हालत आहे ?’
‘राजे ! गड तसा मजबूत नाही. बांदलांचा दिवाण बाजीप्रभू हा कुशाग्र बुद्धीचा धारकरी आहे. एका हाकेबरोबर हिरडस मावळ उभा करण्याची त्याची ताकद आहे. पण गडावर मात्र बेदिली आहे.’
‘बेदिली ?’
‘जी ! कृष्णाजी बांदल हा मोठा लहरी आहे. त्याच्या भोवती खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो.’
‘गल्लत होते, आबाजी ! याच बांदलांनी जेध्यांचा पराभव केला, हे विसरू नका.’
‘त्यालासुद्धा एक कथा आहे.’
‘कसली कथा ?’
‘जेव्हा जेधे-बांदलांचं वैर पेटलं, तेव्हा बांदलांना यश येइना. कृष्णाजी बांदलांची स्त्री दीपाबाई बांदलांच्या गैरमर्जीमुळं कैदेत होती. तिला बेड्या घातल्या होत्या. ती साध्वी होती. जेधे-बांदल लढाईत यश येईना, तेव्हा वडिलधाऱ्या माणसांनी, दीपाबाईची बेडी तोडून तिला सन्मानानं वागवावी, म्हणजे यश प्राप्त होईल, असं सांगितलं. कृष्णाजी बांदलानं तसं केलं. दीपाबाईचा आशीर्वाद घेतला आणि बांदलांनी जेध्यांचा पराभव केला. ही कथा गडावर मशहूर आहे.’
‘असेल ! साध्वीच्या आशीर्वादाचं माहात्म्य आम्ही नाकारीत नाही. रावण दुष्ट असला, तरी त्याची पत्नी मंदोदरी साध्वी होतीच ना ! आबाजी, गडाची हालत काय आहे ?’
‘गड तसा भारी नाही. दक्षिणेची बाजू दुर्लक्षित आहे. गडाभोवती मेटे नाहीत.’
‘ते कसं कळलं ?’
‘एके रात्री दोन चंद्रमे दिले आणि गडाच्या पहारेकऱ्यांनी मला रात्री गडाचे दरवाजे उघडून खाली जाऊ दिलं.’
‘छान केलंत. आता उसंत नाही. बिचारे बांदल आणि त्यांचे दिवाण बाजी आमची वाट पाहत असतील.’
नेताजी पालकर आवेशानं उठले. त्यांनी राजांना मुजरा केला.
‘काय ! काय बेत ?’ राजांनी विचारलं. ‘राजे, ही कामगिरी मला द्यावी !’
‘नाही.’ नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, ‘बांदलांनी आम्हांला आव्हान दिलं आहे. ही कामगिरी आम्हांलाच पार पाडायला हवी.’
नेताजी काही बोलण्याचा प्रयत्न करीत असता राजे त्यांना म्हणाले,
‘काका, आठवतं ? जावळीच्या मोऱ्यांनी आम्हांला असाच निरोप पाठविला होता. त्यासाठी आम्ही ती मोहीम स्वीकारली होती. बांदलांचा समाचार आम्ही जातीनं घेऊ.’
राजे आसनावरून उठले. ते सदरेवर नजर फिरवीत होते.
‘आबाजी, तुम्ही गडाचे माहितगार. तुम्ही, नानाजी, येसाजी, जगताप, पवार, मालुसरे—तुम्ही सर्वांनी योग्य ती माणसं गोळा करा. आम्ही ही गोष्ट मासाहेबांच्या कानांवर घालून परत सदरेवर येऊ.’
राजे सदरेतून उठून वाड्यात गेले.
रात्र वाढत होती. रोहिडा किल्ल्यात बांदलांच्या वाड्याशेजारी असलेल्या घरात बाजी-फुलाजींचा मुक्काम होता. अचानक फुलाजींना जाग आली. त्यांचं लक्ष चौपाईच्या खाली गेलं.
बाजींचं हंतरूण मोकळं होतं. बाहेरच्या सोप्यात टेंभे जळत होते.
फुलाजींनी हाक मारली.
‘बाजी ऽ ’
‘जी !’ म्हणत बाजी आत आले.
‘झोपला नाहीस ?’
‘काय झालं, कुणास ठाऊक ! झोपच लागेना. त्यात अमावास्या. घुबडांनी तर वैताग आणलाय्.’
‘वडावर त्यांची वस्तीच आहे. बिचारी आवाज देणारच !’
त्याच वेळी घुबडांचा घूत्कार परत ऐकू आला. पाठोपाठ एक कोकिळा ओरडली.
‘ऐका ! पण हा घुबडाचा आवाज नव्हे आणि या दिवसांत कोकिळा ओरडते ?’
अर्धवट झोपेतल्या फुलाजींची झोप उडाली.
‘रखवालाऽऽ’ रखवाल्याची आरोळी कानांवर आली. घुंगूर लावलेल्या काठीचा आवाज उठला.
फुलाजी हसले.
‘काही तरी मनात आणू नको. तुला भास झाला असेल. झोप तू. सगळं ठीक आहे.’
बाजींनी भावाची आज्ञा मानली आणि ते निजले. पण डोळे मिटूनही डोळ्यांत झोप उतरत नव्हती. मनाची हुरहूर वाढत होती.

*🚩क्रमश:🚩*