⚔🌄पावनखिंड🌄⚔
🔰 भाग : ०४ 🔰
दोन प्रहरची वेळ असूनही हवेतला गारवा कमी झाला नव्हता. दोहों बाजूंच्या हिरव्या गर्द रानांतून बाजी, फुलाजी दौडत होते. पाठीमागून शिबंदी धावत होती. आकाशात चढलेला रोहिडा किल्ला नजरेत येत होता.
किल्ल्याच्या प्रथम दरवाज्याशी पहारेकऱ्यांचे मुजरे स्वीकारून बाजी-फुलाजींनी किल्ल्यात प्रवेश केला. बांदल देशमुखांच्या वाड्यापुढं दोघे पायउतार झाले. वाड्याच्या नगारखान्यातून आत जाताच त्यांचं लक्ष सदरेकडं गेलं.
नक्षीदार शिसवी खांबांनी सदर सजली होती. प्यालेल्या तेलामुळं त्या खांबांना एक वेगळाच तजेला प्राप्त झाला होता. सदरेवर कृष्णाजी बांदलांची खास माणसं बसली होती.
कृष्णाजी बांदलांनी साठी ओलांडली असली, तरी त्यांचा ताठा कमी झाला नव्हता. कानाच्या पाळीपर्यंत आलेले भरघोस कल्ले, ओठावरच्या पिळदार मिशा त्यांच्या गोल चेहऱ्याला शोभत होत्या. कृष्णाजी उंचीला कमी असले, तरी त्यांचा बांधा भरदार होता. पांढराशुभ्र अंगरखा आणि पायांत तंग विजार घातलेले कृष्णाजी सदरेच्या मधून येरझाऱ्या घालीत होते. त्यांच्या हाती हुक्क्याची नळी होती. त्यांच्या पावलांचा अंदाज घेऊन परातीत हुक्कादान घेतलेला सेवक त्यांच्याबरोबर चालत होता.
कृष्णाजी बांदलांचं लक्ष बाजी- फुलाजींकडं गेलं. त्यांना पाहताच त्यांच्या नमस्काराचा स्वीकार करून कृष्णाजी म्हणाले,
‘या ! बाजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.’
बाजी- फुलाजी सदरेवर गेले.
कृष्णाजी बांदलांना उसंत नव्हती. त्यांचे सल्लागार भास्करपंत यांना ते म्हणाले,
‘द्या ! बाजींना तो भोसल्यांचा खलिता द्या ! मी सांगतो, ही अक्कल त्या शिवाजी भोसल्याची नव्हे. ही ऽ ही त्या दादोजी कोंडदेवांची आहे.’ हुक्क्याचा झुरका घेऊन ते हुक्क्याची नळी हातात उंचावत म्हणाले, ‘ते विसरले असतील, पण आम्ही विसरलो नाही. आमच्यावर हा दादोजी चालून आला असता आम्ही त्याचे स्वार पिटाळून लावले. घोड्यांच्या दांड्या तोडल्या. शिवापूर गाठेपर्यंत त्याला पुरेवाट झाली. एकदा मार खाऊन गेला, तरी अक्कल येत नाही.’
कृष्णाजी बांदलांचं लक्ष खलिता वाचण्यात गढलेल्या बाजींच्याकडं गेलं.
कृष्णाजीपंतांचा संताप उफाळला.
‘बघा ! त्या भोसल्याची भाषा बघा ! ते, म्हणे, बारा मावळचे जहागिरदार ! शहाजी भोसल्याची जहागीर, म्हणे ! आणि आम्हांला विचारतो, राजे केव्हापासून झालात ! हो हो ! आम्ही राजे म्हणवितो. आमची हिरडस मावळात सत्ता आहे ! म्हणावं, ज्याच्या हाती ससा असतो, तोच पारधी.’
कृष्णाजी बांदलांचे गाल बेडकासारखे थरथरत होते. नाकाचा शेंडा तांबडाबुंद झाला होता. हुक्क्याचे दोन झुरके घेऊन क्षणभर थांबत आणि तरारा चालत ते बोलत होते,
‘आम्हांला सांगतो ! आम्ही, म्हणे, प्रजेवर बदअंमल करतो. शिवाजीच्या कागाळ्या विजापूरला कळवतो ! का कळवणार नाही ? आम्ही चाकरी करतो, ती बादशहांची ! ते बादशहाच ! येवढ्या तक्रारी केल्या, तरी अजून झोपेत आहेत. समजेल एक दिवस, शिवाजी म्हणजे काय, ते !’
बाजींनी शिवाजीचा खलिता लक्षपूर्वक वाचून, तो खलिता परत भास्करपंतांच्या हाती दिला.
कृष्णाजी बांदलांनी विचारलं,
‘बाजी, काय म्हणता ?’
बाजींनी भास्करपंतांकडं पाहिलं आणि विचारलं,
‘पंत ! तुमचा काय सल्ला आहे ?’
भास्करपंत आवंढा गिळत म्हणाले,
‘नाही, म्हणजे त्याचं काय आहे; शिवाजी भोसल्याचा पुंडावा वाढतो आहे, हे खरं ! पण त्यासाठी वैर पत्करण्याऐवजी सलूख होतो का, पाहावं. ते नाही जमलं, तर मग आहेच शेवटचा मार्ग.’
‘म्हणजे, लढाई ना ?’ बाजी हसून म्हणाले.
‘लढाई !’
बांदलांच्या तोंडात हुक्क्याची नळी तशीच राहिली. दुसऱ्या क्षणी हुक्कादान घेतलेल्या सेवकाच्या कानशिलावर त्यांची चपराक उठली. ते गर्जले,
‘हरामखोर, हुक्क्यात इंगळ नाही आणि माझ्यामागून नुसता फिरतो. चाकरी सोड आणि देवीचा तळेकरी हो.’
सेवक हुक्कादान घेऊन वाड्यात धावत गेला. कृष्णाजी बांदल भानावर आले. शंकित नजरेनं बाजींच्याकडं पाहत ते म्हणाले,
‘पण, पंत म्हणतात, तसा प्रयत्न करून पाहिला, तर…’
‘राजे ! म्हणजे सलोखा करावा, म्हणता ?’ बाजींनी विचारलं.
‘उगीच कटकट कशाला वाढवावी ? तो येऊ दे. बघू, काय म्हणतो, ते.’
बाजी हसले. ते म्हणाले,
‘तो येतो, तेव्हा काही म्हणत नाही. तो करून मोकळा होतो.’
‘आँ !’ कृष्णाजींनी टाळा वासला.
‘राजे, हा शिवाजी आज कोंढाणा, चाकण, तोरणा, रायगड, पुरंधर, आणि जावळी घेऊन मोकळा झाला आहे. हे गड, हा मुलूख कसा घेतला ? पुरंधरवर भावांची भांडणं मिटवण्यासाठी याला बोलावला. त्यानं त्या भांडणाचा फायदा घेऊन गड ताब्यात घेतला. जावळी अशीच विश्वासघातानं काबीज केली. मोऱ्यांचं पारिपत्य करण्यात यश मिळवलं. येवढंच कशाला ! खुद्द त्याचे मामा सुपेकर मोहिते; त्यांच्याकडं दिवाळीची खुशाली मागायला जाऊन, त्याच आपल्या मामाच्या मुसक्या आवळून त्याला बेंगळूरला पाठवलं. तो शिवाजी उद्या या गडावर घेतलात, तर तो काय बनाव करील, याचा विश्वास भास्करपंत देतात ?’
त्या शेवटच्या सवालानं भास्करपंत दचकले. त्यांचं दंतहीन थोबाड वासलं गेलं. आवंढा गिळत ते म्हणाले,
‘ते खरं… मी तसं नाही म्हणत… पण..’
‘पंत, पण नाही.’ बाजी निश्चयानं म्हणाले, ‘राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आपण आदिलशहाचे नोकर. आज ना उद्या या शिवाजीवर आदिलशाही तुटून पडेल. पडावंच लागेल. शिवाजीचा पराभव झाला की, शिवाजीशी हातमिळवणी करणाऱ्या साऱ्यांवर आदिलशाहीची वक्रदृष्टी होईल. त्या वेळी आपलं भवितव्य काय राहील ? आदिलशाही विरुद्ध टक्कर द्याल ?’
त्या सवालानं कृष्णाजी बांदलांना थरकाप सुटला.
‘आम्ही तसं कुठं म्हणतो ? बाजी, आम्हांला तुमचा सल्ला हवा.’
‘आमचं स्पष्ट मत आहे. हा शिवाजी मोठा होण्याआधी त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचं एकच उत्तर जाईल…’
‘काय ?’
‘उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो.’
साऱ्यांनी बाजींचा निर्णय मान्य केला. नव्या आणलेल्या हुक्कादानाची चव घेत कृष्णाजी म्हणाले,
‘वैर पदरात घ्यायचं, तर पुरं घ्यावं, त्या शिवाजीला खरमरीत उत्तर पाठवा. आणि हे बघा, आता तुम्ही, फुलाजी गडावर ऱ्हावा. तो कधी येईल, सांगता यायचं न्हाई. गड मजबूत ठेवा.’
*🚩क्रमश:🚩*