पावनखिंड 3

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

🔰 *भाग : ०३* 🔰

बाजी वाड्यात गेले. आतल्या सोप्यात ते जेव्हा गेले, तेव्हा गौतमाई तेल-हळद घेऊन आल्या होत्या. पाठोपाठ सोनाबाई आल्या. बाजी अंगरखा उतरत म्हणाले,

‘काही झालं नाही.’

दोघी बाजींच्या दंडावरची जखम पाहत होत्या.

जखम किरकोळ होती. रक्त यायचं थांबलं होतं.

गौतमाई जखमेवर तेल लावत असता सोनाबाई म्हणाल्या,

‘असला कसला खेळ खेळायचा !’

बाजी हसले. म्हणाले,

‘आमचा पानाचा डबा मागवून घ्या.’

गौतमाई बाजींच्या जखमेवर पट्टी बांधत होत्या. त्यांच्याकडं पाहून बाजी हसत होते. गौतमाई त्या हसण्यानं चिडल्या. त्या म्हणाल्या,

‘हसायचं कसलं ते !’

‘तुम्हांला माहीत नाही.’ बाजी सांगत होते, ‘पोर मोठं गुणी आहे. पट्टा चालवताना पाहिलं नाहीत. पाय कसं नाचवीत होतं, ते ! आणि तलवारीची सफाई केवढी ! त्याचा बाप गुणाजी असाच धारकरी होता.’

‘होता !’ सोनाबाई उद्गारल्या.

‘हां ! बांदलांचं आणि जेध्यांचं जेव्हा वैर पेटलं, तेव्हा हा गुणाजी जेध्यांच्या बाजूनं लढत होता. लढाईत कुणीतरी पायावर वार केला. गुणाजी अधू बनला. त्यानंच पोराला तयार केलं आणि माझ्याकडं पाठवलं.’

बाजींनी अंगरखा चढवला आणि त्याच वेळी बाहेरून घोड्यांच्या टापांचा आवाज आला. बाजी उठले आणि सोनाबाईंनी पगडी पुढं केली.

‘कोण आलं ?’

‘दाजीसाहेब !’ सोनाबाई म्हणाल्या.

‘कोण ! दादासाहेब ?’ म्हणत बाजींनी पगडी घातली आणि गडबडीनं ते बाहेर आले.

सोनाबाईंनी सांगितलेलं खोटं नव्हतं.

बाजींचे थोरले बंधू फुलाजी चौकातून सदरेकडं येत होते.

फुलाजी देशपांडे बाजींच्यापेक्षा वयानं मोठे. बाजींच्यासारखीच त्यांची अंगलट. कोणीही दोघांना एकत्र पाहिलं, तर ते सख्खे बंधू आहेत, हे ओळखावं.

बाजी तत्परतेनं सदरेच्या पायऱ्या उतरले. फुलाजींना वाकून नमस्कार केला. फुलाजी म्हणाले,

‘बाजी, तातडीनं गड गाठायला हवा. राजांची तशी आज्ञा आहे.’

‘काय झालं ?’ बाजींनी विचारलं.

‘शिवाजी भोसल्याचा खलिता आला आहे.’

‘खलिता ?’ बाजी उद्गारले.

‘चला. आत सांगतो !’

दोघे सदर ओलांडून वाड्यात प्रवेश करते झाले.

सोनाबाई आणि गौतमाबाईंनी फुलाजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद पुटपुटत फुलाजी म्हणाले,

‘आम्ही गडावर जाणार आहोत तातडीनं !’

दोघे बंधू शयनगृहात गेले. फुलाजी पलंगावर बसले. बाजी जवळ उभे होते.

‘काय म्हणतो शिवाजी भोसला ?’ बाजींनी विचारलं.

‘काय म्हणणार ! आपल्या पुंडाव्यात सामील व्हा, असं सांगतो.’ फुलाजींनी उत्तर दिलं.

‘मग, राजे काय म्हणाले ?’

‘त्यासाठी तर तुला बोलावलंय्. तू त्यांचा प्रधान. तू सल्ला देशील, तो खरा. पानावर बसणार असाल, तर जेवायला गडावर घेऊन या, असं सांगितलंय् राजांनी !’

बाजी, फुलाजी शयनगृहाच्या बाहेर आले.

सोनाबाई, गौतमाई सोप्यात उभ्या होत्या.

त्यांच्याकडं वळून फुलाजी म्हणाले,

‘आम्हांला गडावर तातडीनं जायला हवं !’

‘भोजन करून गेलं, तर…’ सोनाबाई म्हणाल्या.

‘तेवढी उसंत नाही.’ फुलाजी म्हणाले.

दोघींनी फुलाजींना वंदन केलं आणि दोघं सदरेवर आले.

सदरेवर म्हातारे तात्याबा म्हसकर उभे होते. पागेबाहेर आणलेली घोडी आणि दोघांचे वेश बघून तात्याबांनी विचारलं,

‘कुठं जायचा बेत ?’

‘विचारलंत कुठं म्हणून ?’ बाजी उद्वेगानं म्हणाले, ‘येवढं वय झालं, तरी एखादा बाहेर जाताना कुठं म्हणून विचारू नये, हे, तात्याबा, कसं कळत नाही ?’

‘चुकलंच ते… तात्याबा म्हणाले, ‘आता वय झालं नव्हं !’

‘जाऊ दे, रे !’ फुलाजी बाजींना म्हणाले; आणि तात्याबाकडं पाहून ते बोलले, ‘तात्याबा ! राजांचा निरोप आलाय्. गडावर आम्ही जातो.’

‘मग, येऊ मी ?’

‘चल की ! पण तू चालत येणार आणि आम्ही घोड्यावरून जाणार !’

तात्याबानं आपल्या पांढऱ्या मिशीला पीळ भरला आणि तो म्हणाला,

‘म्हातारा झालो, म्हणून मांड ढिली झाली न्हाई.’

सारे हसले. बाजी म्हणाले,

‘तात्याबा, ते खरं ! पन आता तू घरी जाणार. निरोप घेणार. वेळ होईल.’

‘कसला निरोप ! वाड्यावर आलो, तवाच निरोप घेतला घरी. कोन तरी सांगंल घरला; धन्यासंगं गडावर गेलो, म्हणून. आता काय तरनाताठा मी, ते कारभारणीला निरोप सांगू ? त्यो तुमी सांगायचा !’

तात्याबाच्या बोलण्यानं सदरेवरच्या साऱ्यांना हसू आलं.

बाजी म्हणाले,

‘बरं, चल ! उगीच वटवट नको.’

चौकात दोघांचे घोडे घेऊन सेवक उभे होते.

बाजींचं लक्ष यशवंतकडं गेलं. ते फुलाजींना म्हणाले,

‘दादासाहेब, हा यशवंत जगदाळे. गुणाजीचा मुलगा. धारकरी म्हणून आम्ही त्याला घेतला आहे.’ यशवंतकडं वळून बाजी म्हणाले, ‘यशवंतराव, तुमची नेमणूक आमच्या वाड्यावर. लक्ष ठेवा.’

तात्याबासह दोघे बंधू स्वार झाले. वाड्याबाहेर जाताच शिलेदारांचं पथक त्यांना मिळालं. रोहिड्याच्या दिशेनं घोडी उधळत निघाली.

गर्दराईततुन घुमणारा टापांचा आवाज बराच वेळ ऐकू येत होता…

 

*🚩क्रमशः🚩*