पावनखिंड 2

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

*▪भाग : ०२▪*

जेव्हा बाजी भानावर आले, तेव्हा त्यांचं लक्ष चौकाकडं गेलं. सदरेलगत चौकात एक तरुण उभा होता. मांड-चोळणा परिधान केलेल्या त्या तरुणाच्या मस्तकी मराठेशाही पगडी शोभत होती. ओठावर कोवळ्या मिशीची काळी रेघ उमटली होती. चेहऱ्यावर प्रसन्न स्मित रेंगाळत होतं. बाजींची नजर वळताच त्यानं मुजरा केला.

‘कोण ?’ बाजींनी विचारलं.

‘मी यशवंतराव जगदाळे ! भोरच्या गुणाजीरावांचा मुलगा.’

‘का आलात ?’

‘आबांनी तुमांस्नी भेटायला सांगितलं. धारकरी म्हनून पदरी घ्यावं.’

त्या कोवळ्या तरुणाकडं बाजी कौतुकानं पाहत होते. पट्टा, विटा, तलवार, भाला या सर्व शस्त्रांत जो पारंगत असेल, तो धारकरी.

‘धारकरी !’ बाजी उद्गारले. ‘यशवंतराव, आम्ही गुणाजींना ओळखतो. ते आम्हांला परके नाहीत. आम्ही तुम्हांला जरूर आमच्याकडं घेऊ. पण धारकरी म्हणून नव्हे ! शिपाईगिरीत या. पुढं तुमचं कसब आणि इमान बघून आम्ही तुम्हांला जरूर मोठेपण देऊ.’

‘मी धारकरी हाय ! ती जागा मिळाली, तरच आमी चाकरीला येऊ.’ यशवंत म्हणाला.

‘अस्सं !’ आपला संताप आवरत बाजी म्हणाले, ‘कोणती हत्यारं चालवता तुम्ही ?’

‘तलवार, भाला, पट्टा, फरीगदगा…’

‘अरे, वा !’ बाजी मिशीवरून पालथी मूठ फिरवीत होते. पण ओठांवर आलेलं हसू लपत नव्हतं. एकदम बाजी ओरडले,

‘कोण आहे तिकडं !’

सेवक धावले.

बाजींनी आज्ञा केली,

‘हत्यारं घेऊन या.’

काही क्षणांत बाजींच्या समोर हत्यारं ठेवली गेली.

‘यशवंतराव, पट्टा उचला. बघू तुमचं कसब.’

यशवंत सदरेवर आला.

तिथं दोन-तीन पट्टे ठेवले होते. काही क्षण तो पट्टे निरखीत होता. एक एक पट्टा हाती घेऊन त्यानं तो तोलला आणि शेवटी एक पट्टा निवडला.

त्यानं निवडलेला पट्टा पाहताच बाजींचा संताप वाढला.

यशवंतनं निवडलेला पट्टा खुद्द बाजींचा होता.

पट्टा घेऊन यशवंत चौकात उतरला. बाजींनी आपल्या दोन धारकऱ्यांना बोलवलं. बाजी म्हणाले,

‘तलवारी घ्या.’

यशवंतनं चौकात वीरासन घेतलं. उजव्या हातातील पट्टा सरळ धरून त्यानं बाजींना वंदन केलं.

बाजींनी मान तुकवली आणि यशवंतनं उड्डाण करून पट्टा चालवायला सुरुवात केली.

बाजींनी आपल्या धारकऱ्यांना आज्ञा केली,

‘चला !’

यशवंत विजेच्या चपळाईन पट्टा चालवीत होता. दोन्ही बाजूंनी आलेल्या धारकऱ्यांना पुढं घुसण्याची संधी मिळत नव्हती.

बाजी थक्क होऊन यशवंतची करामत बघत होते. सदरेवरचं कोणीतरी म्हणालं,

‘खरा धारकरी हाय.’

बाजींच्या कानांवर ते शब्द पडले. बाजींनी आज्ञा केली,

‘भाला घ्या !’

धारकऱ्यांनी भाले उचलले. यशवंतचा पट्टा चौफेर फिरत होता. धारकऱ्यानं भाला फेकला.

बाजींच्या हृदयाचा एक ठोका चुकला. सरसर भाला आला आणि मध्येच दोन तुकडे होऊन तो भाला कोसळला.

‘भले !’ बाजी भान हरपून म्हणाले, ‘बंद करा !’

तिघेही वीर आपला खेळ थांबवून बाजींच्याकडं पाहत होते.

बाजी झोपाळ्यावरून उठले. यशवंतवर नजर खिळवत ते म्हणाले,

‘पट्टा उतरा आणि तलवार घ्या.’

यशवंतनं तलवार हाती घेतली. बाजींनी आज्ञा केली,

‘माझी ढाल आणा.’

ढाल आणली जाताच बाजी ती ढाल डाव्या हाती घेऊन चौकात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर हासू होतं. यशवंतला बाजी म्हणाले,

‘चालव तलवार…’

नुसत्या ढालीनिशी उभ्या असलेल्या बाजींना बघून यशवंत उद्गारला,

‘जी !’

‘चालव म्हणतो ना ! तुझ्यासारख्या पोरासंगती खेळायचं, तर तलवार कशाला पायजे ? चल !’

यशवंतनं तलवारीचे हात करायला सुरुवात केली.

येणारा प्रत्येक वार बाजी हसत ढालीवर घेत होते. हसत होते.

त्या हसण्यानं यशवंतचा संताप नकळत वाढत होता. तो त्वेषानं तलवार चालवत होता.

बाजी यशवंतला खेळवत होते. बाजी हसून ओरडले,

‘काय, यशवंतराव, रग जिरली ?’

त्या उद्गारांनी यशवंतचं भान हरपलं. त्वेषानं तो बाजींवर तुटून पडला.

ढालीवर पडणारा प्रत्येक घाव बाजींना त्याच्या ताकदीचा अंदाज देत होता. बाजी कौतुकानं यशवंतकडं पाहत होते. त्याच वेळी यशवंतनं बगल दिली. नकळत बाजींची ढाल त्या बाजूतला झुकली आणि मोहरा बदललेली तलवार बाजींच्या हातावर उतरली.

बाजींनी आपल्या उजव्या हाताकडं पाहिलं.

अंगरख्यातून तांबडी रेघ उमटत होती.

यशवंतनं तलवार फेकली आणि बाजींचे पाय धरले.

‘उठा ! यशवंतराव, तुम्ही खरे धारकरी आहात. आमच्या शिलेदारीत तुमची नेमणूक केली आहे. उठा !’

‘माझ्यामुळं आपणांला….’

‘चालायचंच ! असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही.’ वाड्याकडं पाहत बाजी म्हणाले, ‘जरा तेल- हळद घ्या.’

 

 

*🚩क्रमशः🚩*