पेशवाईतील स्त्रिया – भाग १३
अहिल्याबाई
बहुतेकदा पेशवाई हा शब्द एका कुटुंबाला किंवा जातीला जोडला जातो , पण खरंच विचार करायला हवा पेशवाई म्हणजे केवळ एक घराणे आहे ? पेशवाई भट कुटुंबा पुरताच मर्यादित होती का ?
पेशवाई म्हणजे तो संपुर्ण काळ, ज्या वेळेस बाळाजी विश्वनाथाना पेशवाई ची वस्त्रे मिळाली तेंव्हा पासुन ते दुसरे बाजीराव इंग्रजांना शरण जाई पर्यँत, म्हणजे इसवी सन १७१३ ते १८१८ असा एकशे पाच वर्षांचा काळ ….
ही एकशे पाच वर्ष मराठी साम्राज्य टिकायला अनेक आठरा पगड जातींचे हात लागले होते …
म्हणुनच पेशवाईतील स्त्रिया म्हणजे जशा पेशव्यांच्या सुना आणि लेकी आल्या तसेच त्या काळातील इतर सरदार घराण्यातील आणि कारभाऱ्यांच्या पत्नी , मुली आणि सुना पण यायला हव्यातच ना ?
अशीच एक थोर कर्तृत्ववान स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर !
थोरल्या बाजीरावांच्या काळापासुन माळवा प्रांताची जबाबदारी होळकर घराण्याकडे होती , मल्हारराव होळकर पेशव्यांचे विश्वासु … त्यांचे चिरंजीव खंडेरावांची पत्नी म्हणुन अहिल्याबाई होळकर कुटुंबात आल्या …मराठवाड्यातील बीड जिल्हयातील मौजे चोंढे गावातील माणकोजी शिंद्यांकडे गावची पाटीलकी होती त्यांची ही कन्या , लिहा वाचायला येणारी ही आठ वर्षाची मुलगी माळवा प्रांतात आली आणि स्वतःचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहुन गेली.
कर्तबगार सासरे आणि धार्मिक पण करारी सासु गौतमाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाईंचे व्यक्तीमत्व घडत गेले ,
तल्लख बुद्धी असलेल्या सुनेवर सासऱ्यांचा प्रचंड विश्वास होता, महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेराव आणि अहिल्याबाईंना दोन अपत्ये झाली, मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या.
त्या काळच्या स्त्रियांना नियती वैधव्य माथी लिहुनच जन्माला घालत असावी असे वाटुन जाते ..वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी म्हणजे १७५४ साली पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत कामी आले आणि अहिल्याबाईना वैधव्य देऊन गेले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.” सासऱ्यांच्या इच्छेचा मान ठेवुन सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित करायचा निर्णय त्यांनी घेतला.
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्या करता मल्हारराव सतत मोहिमा आखत होते, मल्हाररावांच्या अनुपस्थितीत संपुर्ण राज्यकारभार अहिल्याबाई पाहत होत्या , अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ मल्हारवांना मृत्यूने गाठले….मल्हाररावानी पेशव्यांच्या चार कारकिर्दी बघितल्या होत्या, एकुणच पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.
अशा या मल्हाररावांचा मृत्यु पेशवे आणि आहिल्याबाई दोघांकरता एक धक्का होता …ओघानेच अहिल्याबाईंवर मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचे पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली, पण दुर्दैवाने २७ मार्च १७६७ ला त्यांचाही मृत्यु झाला… एका वर्षाच्या आत दोन मोठे धक्के…
धक्यांना न डगमगणारी माणसंच इतिहास घडवत असतात …
इथुन अहिल्याबाई खऱ्या अर्थाने राज्यकर्र्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला…असे अनेक घाव पचवले ..
आपल्या कारकिर्दीत कीती गोष्टी केल्या असाव्यात ?राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली …तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात असलेले प्रशस्त देवघर आजही बघण्या सारखं आहे … नदीला घाट बांधले….अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.
त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी वेळ आली की कठोर निर्णय घेत , अहिल्याबाई अतिशय धर्मपरायण होत्या ..होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
राज्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई ?
अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया , धर्मशाळा बांधल्या . राज्यात हकीम वैद्य नेमले . स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडत होत्या …
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या.
उभ्या आयुष्यात अहिल्याबाईंनी कीती मंदिरे बांधली आणि कीती देवळांचा जीर्णोद्धार केला याची गणतीच नाही …
पेशव्यांवर त्यांची अपार निष्ठा होती , माधवराव , सवाई माधवराव ,नाना फडणवीस त्यांचा योग्य मान करत .
त्यांची मुलगी मुक्ताबाई , हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी झाला होता , हे यशवंतराव ३ डिसेंबर १७९१ ला वारले , तेंव्हा मुक्ताबाई सती गेल्या , त्या पुर्वी १७९० ला मुक्ताबाईचा मुलगा आणि अहिल्याबाईंचा नातु नथाबा मृत्यु पावला होता …
आयुष्यात दुःखा बरोबर अनेक संघर्षानाही तोंड द्यावे लागले…. पेशवाईच्या गादीवर सवाई माधवराव होते, पेशव्यांकडे अहिल्याबाईंना मनाचे स्थान होते ,
त्यांचा जुना दिवाण गंगाधर चंद्रचुड हा राघोबादादांना जाऊन मिळाला आणि राघोबादादा ला इंदुर बळकावण्याचा सल्ला दिला , आहिल्याबाईनी परिस्थितीला सामोरे जाऊन राघोबादादाची योग्य कान उघडणी केली … इथुन पुढे राघोबादादा अहिल्याबाईंना वचकुन राहिले ..
शिंदे – होळकर हा वाद फार जुना , त्यालाही त्यानी धैर्याने तोंड दिले , स्वतः त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर आलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीच्या , सावळ्या वर्णाच्या , डोईवर पदर घेतलेल्या अशा या स्त्री कडे पाहुन भले भले नतमस्तक होत होते … कारण होते त्यांचे आभाळा एवहढे थोर कर्तृत्व !!
राहाणी अतिशय साधी , कायम पांढरी पातळे , दरबारात आसनावर पांढरी घोंगडी अंथरलेली असे …..
दिनचर्या ठरलेली , सुर्योदयापुर्वी उठणे , त्या नंतर स्नान आणि पुजा अर्चा , नंतर दान धर्म , दरबारात जाऊन काम काज पाहणे , संध्यकाळी देवळात जाणे … या दिनचर्येत बहुतेकदा खंड नसे .
अहिल्याबाई ना पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य मिळाले … पण आयुष्यात एकावर दुःख पचवत होत्या .. त्यात राज्यकर्त्यांची परिस्थिती मोठी विचित्र असते , प्रजेचा विचार करून पोटातले दुःख डोळ्यात किँवा ओठावर आणायची परवानगी नसते…
शिव उपासक असलेल्या अशा या थोर स्त्रीचे १३ ऑगस्ट १७९५ ला महेश्वरला वृद्धापकाळाने निधन झाले….
©️बिपिन कुलकर्णी
संदर्भ –
मराठी रियासत खंड ७ आणि इतर
भारतीय संस्कृती कोष खंड १०