पेशवाईतील स्त्रिया भाग ५

पेशवाईतील स्त्रिया भाग ५

भाऊसाहेबांची स्त्री – पार्वतीबाई

पेशवाईतील स्त्रियां वर लक्ष्मी आणि सरस्वती चा वरद हस्त होता पण दुर्दैवाने नियती ची साथ नव्हती …..

प्रत्येकीला सौंदर्य ,ऐश्वर्य , हुशारी भरभरून मिळाले … पण हे देत असताना अकाली वैधव्य दिले ….पती निधना नंतर अन्नपुर्णा बाई आणि रमा बाई सती गेल्या आणि बाकीजणी विधवे चे आयुष्य जगत राहील्या ….

पार्वतीबाई ची कथाच निराळी …. समाजाच्या दृष्टीने त्या विधवा होत्या पण पानिपतावर भाऊसाहेबांचे शेवटचे दर्शन न झाल्याने त्यानी सौभाग्यलंकार उतरवले नव्हते …

पेण मधील कृष्णराव मोरेश्वर कोल्हटकरांची ही कन्या , सदाशिव भाऊंची दुसरी पत्नी …

भाऊचे पहिले लग्न ७ फेब्रुवारी १७४० झाले होते उमाबाईशी, त्यांचे माहेरचे आडनाव भानु …भाऊ आणि उमा बाईना दोन मुले झाली पण अल्पजीवी ठरली .. त्या नंतर आजार पणाने उमा बाई २२ मार्च १७५० ला वारल्या ….

प्रथे प्रमाणे लगेचच सदाशिवभाऊचे दुसरे लग्न झाले आणि पार्वती बाई २६ एप्रिल १७५० ला पेशवे परिवारात आल्या ..दिसायला सुंदर , लिहिता वाचता येणाऱ्या अशा पार्वतीबाईचे माहेर म्हणजे कोल्हटकर गडगंज घराणे होते …वडील पेण मधील सावकार …

पार्वतीबाई अतिशय सोशिक , सात्विक , भोळ्या स्वभावाच्या होत्या … सहसा कोणाशी वाद होत नसत …लग्न होऊन आल्या तेंव्हा वाड्यात एकाहुन एक दिग्गज स्त्रिया होत्या … राधाबाई सारख्या आज्जे सासुबाई , काशीबाई चुलत सासु बाई … आणि साक्षात गोपिकाबाई सारख्या जाऊबाई … असं असुनही वाड्यात सगळ्याशी समंजस पणाने वागुन त्यांनी आपली जागा निर्माण केली होती …

अवघा काही वर्षाचा संसार झाला आणि मग आली पानिपताची वेळ …रंगपंचमीचा दिवस होता आणि त्या दिवशी रंग खेळुन झाल्यावर सदाशिवभाऊनी मोहिमेवर जाण्याचा निश्चय सांगितला ….

त्या काळी मोहिमे वर जाताना बुणगे म्हणजे सैनिक सोडुन इतर लोक जे देवदर्शनाच्या उद्देशाने बरोबर जात … त्या बुणग्या मध्ये कारभारातील स्त्रियाही जात …तशाच पार्वतीबाई गेल्या असाव्या असे एक मत आहे .. दुसरे मत असे की गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत राहायला नको त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता.. कारण काहीही असो त्या पानिपतावर गेल्या हे खरं …

पानिपत रणसंग्राम हा वेगळा विषय ..पण तो होत असताना पार्वतीबाई हत्तीवर अंबारी मध्ये बसुन युद्धभुमी वर होत्या यातच सगळं आलं …त्यांच्या डोळ्या समोर विश्वासरावांना गोळी लागुन मरण आले … विश्वासरावाचा मृत्यु पाहुन भाऊसाहेब अजुन त्वेशाने लढायला गेले … तीच या पती पत्नीची शेवटची भेट …

अंबारी मध्ये बसलेल्या पार्वतीबाईनी कोवळ्या विश्वासरावाचा निश्चल देह पाहुन ऊर आणि कपाळ बडवुन घेतले …त्या म्हणतात ” ईश्वरे आम्हास एव्हढे निर्वाण का दाखवले ? विश्वासरावा सारखे रत्न हरपोने गेले ” ….त्या वेळेस शेजारच्या अंबारीत होत्या नाना फडणवीसांच्या आई , त्यांनी सांत्वन करायचा प्रयत्न केला …. पण त्या रणांगणावर चारी बाजुला दुःखच एव्हढे होते की कोण कोणाचे आणि कसे सांत्वन करणार?

ह्याच नाना फडणवीसांच्या मातोश्री पण पुढे जाऊन युद्धात गायब झाल्या …

युद्धाचा बेरंग झाला होता , पार्वतीबाई अंबारीतुन उतरून इतर बुणग्या बरोबर बाहेर पडायचा प्रयन करू लागल्या …. पार्वती बाई चे सेवक त्यांच्या करता घोडा घेऊन आले …पण दुःख आणि भीती मुळे त्या पुर्ण गलितगात्र झाल्या होत्या , घोडयाच्या रिकबीत त्यांना पाय पण ठेवता येईना …अशा वेळेस जानु भिंताडा नावाचा एक सेवक ,त्याने परिस्थती चे भान ठेऊन पार्वतीबाईना पाठीवर घेतले आणि चालु लागला ….मग कधी पाठीवर कधी घोडयावर असे करत जानु भिंताडा त्यांना दिल्ली पर्यन्त घेऊन आला … हे अंतर आहे जवळ पास १०० किलोमीटर !!!

दिल्ली मध्ये सदाशिव भाऊ भेटतील अशी पार्वतीबाईची भाबडी आशा होती … पण तसे काही घडणार नव्हते …इतर सरदार म्हणजे नाना पुरंदरे , मल्हार राव होळकर अशी मंडळी भेटली आणि तिथुन पुढे त्या इतर लोका बरोबर पुण्याच्या दिशेने निघाल्या …

संपुर्ण प्रवासात या सगळ्यांचेच खुप हाल झाले …पैसा तर नव्हताच … अंगावरच्या कपड्यानिशी प्रवास चालु होता .. त्यात उत्तरेतली थंडी ..प्रचंड उपास मार हे कमी म्हणुन की काय त्यात रोगराई चालु होती …पण मजल दर मजल करत त्या पुण्यात आल्या ..

भाऊ आणि पार्वतीबाईना दोन अपत्ये झाली होती

पण दुर्दैवाने लहानपणिच वारली …

नवरा पानिपतावर गायब झालेला , पोटचे मुल नाही काय अवस्था झाली असेल त्यांची ? कोणा कडे पाहुन आणि कशा करता जगावे असा प्रश्न पडला नसेल का ?

पण परिस्थितीला धीराने तोंड दिले …. पेशवाईतील इतरांनी विशेषतः माधवरावानी त्यांची काळजी घेतली .. पुढे जाऊन पार्वतीबाईनी नारायणरावाच्या खुना नंतर त्यांची पत्नी गंगाबाईचे डोहाळ जेवण , बाळंतपण तर केलेच आणि गंगाबाई च्या मृत्यु नंतर सवाई माधवरावाचे संगोपनही केले …या मुळेच बखर कार त्यांना सात्विक स्त्री म्हणतात …..

त्या पुर्वी सदाशिवभाऊच्या तोतया चे प्रकरण झाले , त्या वेळेस चा त्यांचा समंजस पणा वाखाणण्या सारखा होता …त्या नंतर ची एक घटना १७७३ ची , राघोबा दादा आणि आनंदी बाई ची मुलगी दुर्गाबाई हिचे लग्न होते , लग्न मंडपात वर पक्षाची मंडळी आडून बसली , शास्त्रा प्रमाणे पार्वतीबाई चे केशवपन झाल्या शिवाय लग्न लागणार नाही …पार्वतीबाई जेवढ्या सोशिक तेव्हढ्याच करारी होत्या , त्यांनी निक्षुन नकार दिला …

असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले ..

देवा धर्मा ची आवड म्हणुन पेशवाईतील इतर स्त्रिया प्रमाणे नंतर काही तीर्थयात्रा केल्या …

१६ ऑगस्ट १७८३ ला त्या अनंताच्या प्रवासाला गेल्या ….त्यांच्या अंगावर सौभाग्यलंकार असल्या मुळे पानिपता नंतर सदाशिवभाऊ चे क्रियाकर्म झालेले नव्हते , म्हणुन एकत्र दोघांचे संस्कार केले गेले …

अशी ही नियतीने अन्याय केलेली भाऊसाहेबांची स्त्री ….

नियतीने जरी अन्याय केला तरी आजच्या पिढीने आदर दाखवत , भाऊ इतकी उत्सुकता त्यांच्या बद्दल ठेवली यातच सगळं आलं …

©️बिपीन कुलकर्णी

@Bipin Kulkarni

 

संदर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

भाऊसाहेबांची बखर – डॉ यु म पठाण

सदाशिवरावभाऊ – कौस्तुभ कस्तुरे

 

#पेशवाईतीलस्त्रिया