*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : ४६* 🔰
गजाखिंडीत बाजी आपल्या धारकऱ्यांसह राहिले होते. दाट धुक्यानं माखलेली गजाखिंड पहाटेची विरळ होत होती. वीस कोस धावत आलेले धारकरी धापा टाकीत गजाखिंडीत विसावले होते. गजाखिंडीच्या दोन्ही दरडा दाट रानानं वेढल्या होत्या. अरुंद गजाखिंड दगडधोंड्यांनी व्यापली होती. बाजी सर्वांना म्हणाले,
‘आता थोडी विश्रांती घ्या, जरा ताजेतवाने व्हा!’
सारी फौज बाजींच्या आज्ञेनं पांगली. वीस कोस धावत आलेल्या त्या माणसांना भिजल्या अंगाची, थंडी-वाऱ्याची जाणीव राहिली नव्हती. झाडाझुडुपांतून ते विसावले होते. पानांवर पडलेले धुक्याचे थेंब त्यांच्या अंगावर ठिबकत होते. पण वीस कोस धावत आलेल्या वीरांची छाती अजून धापावत होती. दिसंल त्या ठिकाणी ते विसावले होते.
बाजी, फुलाजी एका झाडाखाली थांबले होते. बाजींनी विचारलं,
‘भाऊ, आता कसं?’
‘कसं?’ फुलाजी निष्काळजीपणं म्हणाले, ‘आता काम सोपं! ही चिंचोळी खिंड लढवायला पाच-पंचवीस खूप झाले. केवढी जरी फौज चालून आली, तरी मागं रेटता येईल. फेराफेरानं खिंड लढवू.
‘काळजी वाटते, ती राजांची! खरंच, भाऊ! हा सुर्वे इथं बसला आहे, हे माहीत असतं, तर राजांना इथं आणलं नसतं.’
‘झालं गेलं, होऊन गेलं. तू चिंता करू नको. आपला राजा देवमाणूस आहे. देव त्याला हजार हातांनी राखेल.’
बाजींनी काही उत्तर दिलं नाही.
पहाट झाली. रात्रभर गारठलेल्या पाखरांनी आपली अंगं झाडली. त्यांच्या चिवचिवाटानं रान गजबजून गेलं. दिवस उजाडला, तशी घोडखिंडीची भयाणता दिसू लागली. दोन्ही बाजूंची दरडं आकाशात चढली होती. त्यांची उतरंडं दाट रानानं भरली होती. खिंडीचा निमुळता रस्ता अजगरासारखा पसरला होता. वाढत्या दिवसाबरोबर धुकं विरळ होत होतं.
बाजींचे सैनिक विसावले असतानाच नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,
‘बाजी! गनीम नजीक आला.’
‘बाजी! गनीम नजीक आला.’
बाजी उठले. त्यांनी साऱ्या मावळ्यांना खिंडीच्या दोन्ही बाजूंच्या रानांत आश्रय घ्यायला सांगितलं. आघाडीची माणसं निवडली. बाजींनी फुलाजींना सांगितलं,
‘भाऊ! तुम्ही तुकड्या पाडा. मी माझी तुकडी घेऊन सामोरा जातो. दमानं खिंड लढवायला हवी. जोवर राजे पोहोचल्याची तोफ कानांवर येत नाही, तोवर एकही शत्रू या खिंडीतून जाता कामा नये.’
बाजी आपल्या मावळ्यांसह गजाखिंडीच्या तोंडाला, झाडीचा आश्रय घेऊन उभे राहिले. घोड्यांच्या टापांचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता. बाजींनी हातात पट्टा चढवला – धारकऱ्यांनी ढाल – तलवारी पेलल्या. साऱ्यांचं लक्ष गजाखिंडीच्या वाटेवर लागलं होतं. गजाखिंडीच्या जवळ येऊन मसूदचे घोडदळ पायउतार झालं.
मसूदनं त्वेषानं आरोळी दिली,
‘आगे बढोss’
भर पावसाळी एखादा संतप्त ओढा खळाळत, फेसाळत यावा, तसा मावळ्यांचा लोंढा मसूदच्या फौजेवर तुटून पडला. उठलेल्या ‘जय भवानीss’ ‘हर हर महादेवss’ च्या गर्जनेत शत्रूचे ‘दीनs दीनss’ आवाज लुप्त झाले. बाजी पट्टा सरसावत रणांगणात उतरले होते. आवाज ऐकू येत होता, तो तलवारींच्या खणखणाटाचा आणि आर्त किंकाळ्यांचा. बाजींचा पट्टा विजेसारखा चौफेर फिरत होता. बाजींचं पागोटं केव्हाच पडलं होतं. संजाबावरून रूळणारी शेंडी हेलकावे घेत होती. बेभान झालेले बाजी टिपरी घुमावी, तसे लढत होते. _शत्रूच्या शस्त्रांनी झालेल्या आघातांनी फाटलेल्या वस्त्रावर रक्ताची शिवण चढत होती._
मसूदचे सैनिक त्या माऱ्यानं मागं सरत होते. थकलेले बाजींचे वीर मागं सरकले आणि त्यांची जागा फुलाजी आणि त्यांच्या धारकऱ्यांनी घेतली.
जखमी झालेले बाजी मागं येऊन विसावले होते.
फुलाजी खिंड लढवीत होते.
शिवाजी राजे, यशवंत आणि आपल्या मावळ्यांसह दीड कोसावर असलेल्या खेळण्याकडं जात होते. खिंडीतून वर चढलेल्या आणि आपल्या तीनशे धारकऱ्यांसह येणाऱ्या राजांना मोर्चेवाल्यांनी पाहिलं. सुर्व्यांचे आणि पानवलकरांचे पडलेले हजार-दीड हजाराचे मोर्चे खेळण्यासारख्या विशाल गडाला अपुरे होते. शेकडो धाराईतांसह गडावर चढणारे धारकरी पाहताच सुर्व्यांच्या मोर्चेवाल्यांनी आपलं बळ एकत्र केलं.
राजांनी हाती पट्टा चढवला होता. राजांच्या संगती तळपत्या तलवारीसह यशवंत धावत होता. राजे आणि यशवंत यांना गराडा घालून धारकरी सुर्व्यांच्या वेढ्याला भिडले.
सुर्व्यांच्या वेढ्याला राजांची गाठ पडली होती.
सुर्व्यांच्या मोर्च्याचे असामी कमी होते. पण ते शर्थीनं लढत होते. राजे पट्टा चालवत पुढं सरकत होते. यशवंता राजांचं ते कसब आश्चर्यचकित होऊन पाहत होता. एखादं सुदर्शन फिरावं, तसं राजे पट्ट्याचं मंडळ आखत होते. एक पट्टेकरी आणि दहा धारकरी ही उक्ती सार्थ ठरली होती. चक्राकार फिरत जाणाऱ्या राजांची वाट मोकळी करण्यासाठी यशवंत समोरच्या गर्दीत शिरला. यशवंत आपली तलवार चालवीत असता अचानक, त्याच्या पायाखालचा दगड ढासळला. तोल सावरण्याचा प्रयत्न करीत असता यशवंत पालथा पडला. ती संधी साधून शत्रूचा एक सैनिक धावला. राजांचं लक्ष यशवंताकडं गेलं. आपल्या जागेचं भान न बाळगता राजे धावले आणि पाहता-पाहता यशवंतवर उगारलेल्या शत्रूच्या तलवारीचा हात कलम केला. किंचाळत तो सैनिक कोसळला. राजांनी हात देऊन यशवंतला उठवलं. तलवार सावरून यशवंत परत लढू लागला.
राजांचं पथक पुढं सरकत होतं. क्षणाक्षणाला शत्रूचं बळ सरत होतं.
राजांनी वेढा फोडण्यात यश मिळवलं. दूर दिसणाऱ्या खेळणा गडाच्या प्रवेशद्वाराकडं त्यांच लक्ष लागलं होतं. आलेल्या यशानं आनंदित झालेले मावळे जखमांच्या वेदना विसरून राजांच्या समवेत गडाकडं धावत होते.
धावत जात असलेले राजे एका ठिकाणी काही क्षण विश्रांतीसाठी थांबले. ती संधी साधून यशवंत पुढं झाला. राजांचे पाय शिवत तो म्हणाला,
‘राजे, आपण होता, म्हणून मी आज वाचलो.’
राजांनी यशवंतला उठवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले,
‘यशवंता, तुला वाचवलं नाही, तुझ्या नावानं कुंकू बाळगणारी सखू आम्हाला आठवली. त्या पोरीसाठी धावावं लागलं. चल, गड जवळ करू.’
राजे सर्वांसह गडाकडं चालू लागले.
*🚩 क्रमशः 🚩*