पेशवाईतील स्त्रिया भाग १४

पेशवाईतील स्त्रिया – भाग १४

पेशव्यांची न होऊ शकलेली सुन- राधिकाबाई

 

पेशवाईतील स्त्रियांचा विचार करताना जसं सुना लेकी बद्दल भरभरून बोललं किँवा लिहिलं जातं तसं काही कारणा मुळे जर एखादी स्त्री पेशवे घराण्याची सुन होऊ शकली नसेल तर तिच्या अस्तित्वाची नोंद ” पेशवाईतील स्त्रिया ” मध्ये घ्यायलाच हवी !

सरदार गुप्त्यांचे पेशवाईत वजन होते , नुसते पेशव्या कडेच नाही तर सातारच्या छत्रपतींच्या दरबारात त्यांना मान होता , सरदारांचे लग्न आवाबाई कोल्हटकरांशी झाले होते , आवाबाइंच्या लहान बहीण म्हणजे पार्वतीबाई , सदाशिव भाऊच्या पहिल्या पत्नी उमाबाईच्या अकाली निधना नंतर शाहु महाराजांनी सुचवल्या मुळे पार्वतीबाई लग्न होऊन सदाशिवभाऊच्या पत्नी म्हणुन पेशवाई मध्ये आल्या.

 

सखाराम हरी गुप्ते म्हणजे सरदार गुप्ते हे आंबेगावचे , अतिशय शूर सरदार , राघोबादादांच्या अटकेपार झेंडे लावण्याच्या मोहिमेत गुप्त्यांचा मोलाचा वाटा होता , अशा या शुर सरदार आणि पत्नी आवाबाईच्या पोटी ४ जुलै १७४५ ला कन्यारत्न जन्माला आले तिचंच नाव राधिकाबाई.

राधिकेचं लहानपण मावशी पार्वतीबाई बरोबर साताऱ्यात गेले , साताऱ्यात असताना राधिकेसारखी चुणचुणीत मुलगी छत्रपतींच्या नजरेत भरली आणि ती त्यांना विश्वासरावां करता योग्य वाटली , छत्रपतींनी नानासाहेब पेशव्यांना तशी सूचना केली. छत्रपतींच्या आज्ञे प्रमाणे नानासाहेबांनी त्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव यांचा विवाह राधिकाबाईंशी निश्चित केला…. पण …

 

नानासाहेबांच्या पत्नी आणि विश्वासरावांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या मर्जीशिवाय पेशवाईतील कुठलीही कौटूंबिक गोष्ट घडत नसे ,

 

गोपिकाबाईना ही सोयरीक मान्य नव्हती त्याचं मुख्य कारण होते , पेशवे हे चित्पावन बाह्मण तर गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते.. असं असल तरी छत्रपतींच्या आज्ञेला नाकारायचे धाडस गोपिकाबाईच काय अख्या पेशवाईत कोणातच नव्हते !

१७४९ साली चैत्र पाडव्याला विश्वासराव आणि राधिकाबाईंचा साखरपुडा पार पडला , त्या वेळेस दोघांची वये होती आठ आणि चार वर्षे.

साखरपुड्या नंतर राधिकाबाई साताऱ्यात मावशी म्हणजे पार्वतीबाईच्या बरोबरीने युद्धशास्त्र आणि राजकारणाचे धडे गिरवत होत्या .

 

राधिकाबाई आणि विश्वासरावांचे लहान पण सातारा पुणे अशा ठिकाणी बरेच एकत्र गेले, त्या आठ वर्षाच्या असताना तेव्हा होळीच्या उत्सवा करता पुण्यात शनिवारवाड्यात आल्या होत्या , तेंव्हा वाड्यात भव्य मेजवानी सुरू होती तशातच श्रीमंत विश्वासरावानी तिला आपल्या शेजारी बसवुन घेतले…त्या काळात ही प्रथा नव्हती. त्यामुळे एकुणच शनिवार वाड्यात हा प्रकार रुचला नाही , गोपिकाबाईंनी तर गोंधळ माजवला..

 

गोपिकाबाईना ही सोयरीक पटलेलीच नव्हती त्यामुळे

कधी जातीचे कारण देऊन, तर कधी जन्मपत्रिका जुळत नसण्याचे कारण पुढे करून तर कधी मुलीवरच्या संस्कारांचे कारण सांगुन साखरपुडा झाल्यावरही गोपिकाबाई लग्न पुढे ढकलत होत्या.

 

मध्यंतरीच्या काळात छत्रपती शाहूंचे दुर्दैवी निधन झालेहे सगळे होत असतानाच्या काळात गोपिकाबाईंनी विश्वासरावाचा पहिला विवाह सावकार पटवर्धनांची कन्या लक्ष्मीबाईशी उरकुन घेतला होता. असे असले तरी विश्वासरावांचे राधिकेवर प्रेम बसलेले होते त्यांनी गोपिकाबाई जवळ राधिके बरोबर लग्नाचा हट्ट धरून ठेवला होता , मग गोपिकाबाईनी विश्वासरावाना शब्द दिला , पानिपत मोहिमेवरून आल्यावर लगेच लग्न लावुन देण्याचा …त्या वेळेस नियती फक्त हसत होती !

 

पानिपतावर विश्वासराव कामी आले , आणि लग्न न होता राधिकाबाई वयाच्या सोळाव्या वर्षी विधवा झाल्या!! गोपिकाबाईंनी राधिकाबाई ला आपल्या तरुण मुलाच्या मृत्युला जबाबदार धरले आणि त्यांच्या माथ्यावर अपशकुनी असा ठपका ठोकला , खरं तर विश्वासरावांच्या मृत्युने राधिकाबाई उध्वस्त झाल्या होत्या , त्यांनी सर्वस्व गमावले होते ,स्वतः चे दुःख कोणाला सांगणार ? मग पुढील सारे आयुषय त्यांनी विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठी आश्रमात ‘योगिनी’ म्हणून व्यतीत करायचं ठरवलं …योग आचरणाऱ्या पुरुषास योगी तर स्त्रीला योगिनी म्हणतात .योगिनी म्हणुन आयुष्य काढत असताना त्यांनी बऱ्याच तीर्थयात्रा केल्या ,

 

तिकडे काही काळा नंतर गोपिकाबाईंनी पुणे कायमचेच सोडले. एके काळची पेशवीणबाई, जिच्या एका इशाऱयांवर अक्खी पेशवाई हलत होती … तीच पेशवीणबाई पंचवटी मध्ये एका मठात साध्वीचे आयुष्य जगत होती … पाच घरात भिक्षा मागुन आयुष्य काढत होत्या …तिथेही त्यांचा स्वभाव बदलला नव्हता. फक्त सरदार किंवा सरंजामदारांच्या घरातील स्त्री कडुन भिक्षा घ्यायच्या.

 

एकदा एका घरात भिक्षा मागत असताना भिक्षा वाढायला आलेली स्त्री होत्या राधाबाई .. न होऊ शकलेल्या सासु सुनेची नजरा नजर झाली आणि सासूबाईंचा तोल गेला … भोगलेल्या सगळ्या दुःखा चा उद्रेक राधिकाबाई वर काढला …त्या नंतर राधिकाबाईचे झालेले ‘अशुभ दर्शन’ आणि त्याचे प्रायश्चित म्हणुन गोदावरी घाटावरच गोपिकाबाईंनी उपोषण चालू केले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला…

 

नियती निष्ठुर असते असे म्हणतात , या न झालेल्या सासु सुनेची भेट होणं गरजेचं होत का ?

 

ज्या राधिकाबाई ला अपशकुनि ठरवले त्यांनीच या न झालेल्या सासूबाईंची अंत्यसंकराची तजबीज केली आणि त्यांच्या आठवणीत गोदावरीच्या तीरावर त्यांच्या नावे एक दीपमाळ उभी केली .

 

या घटने नंतर नऊ वर्षांनी म्हणजे २९ नोव्हेंबर १७९८ रोजी हरिद्वार मुक्कामी वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी राधिकाबाईंनी अखेरचा श्वास घेतला.

 

सगळेच अतर्क्य !!!

 

©️बिपीन कुलकर्णी