पेशवाईतील स्त्रिया भाग ६
माहेरवाशीण अनुबाई घोरपडे ….
पेशवे घराण्यातील स्त्रियांचा विचार करत असताना बहुतेकदा आपल्या डोळ्या समोर सासुरवाशिणीं येतात , पण काही माहेरवाशिणी अशा होत्या ज्यांचे कर्तृत्व म्हणा किँवा आयुष्याचा झगडा इतर स्त्रियांपेक्षा कमी नव्हता ….. त्या पैकीच एक …
अनुबाई घोरपडे …
बाळाजी विश्वनाथ आणि राधा बाईच्या पोटी ह्यांचा जन्म झाला …थोरले बाजीराव आणि चिमाजी आप्पाची ही लाडकी लहान बहीण ..
त्या वेळच्या पद्धती प्रमाणे वयाच्या सहाव्या – सातव्या वर्षी विवाह इचालकरंजी संस्थानातील सरदार घराण्यात
अनुबाईचा विवाह झाला …त्यांचे सासरे नारायणराव घोरपडे प्रतिष्ठित आणि पेशव्यांचे विश्वासु सरदार …
इचलकरंजीकर घोरपडयांचें पुर्वीचे नाव होते वरवडेकर जोशी पण नंतर त्यांनी घोरपडे नाव लावायला सुरुवात केली …
नारायणरावांचा मुलगा व्यंकटराव याला बाळाजी विश्वनाथ यांनी आपली मुलगी अनुबाई दिली; लग्न साताऱ्यात थाटा माटात पार पडले …
लहान बहिणीवर मोठ्या भावांचा म्हणजे थोरले बाजीराव आणि चिमाजीअप्पांचा फार जीव होता , लहानपणिच दोन्ही भावा बरोबर घोडे स्वारी , लिहिणे वाचणे त्या शिकल्या होत्या …
अनुबाईचे सासर आणि माहेर या दोन्ही घराण्यात राजकारण , खलबते , युद्धमोहिमा या वर सतत चर्चा व्हायची त्या मुळे अनुबाईला राजकारणाचे बाळ कडु मिळायला लहानपणा पासुनच मदत झाली …
नारायणरावांच्या मृत्यु नंतर अनुबाईचे पती व्यंकटराव संस्थानाचे मुख्य झाले …आपल्या बहिणीसाठी थोरल्या बाजीरावानी इचलकरंजी संथानाला मदत करत संस्थान वाढेल याची काळजी घेतली , वेळ प्रसंगी शाहु महाराजांकडे शब्द टाकला , महाराजांनीही पेशव्यांच्या शब्दाला मान देऊन व्यंकटरावाना काही गावाची सनद इचलकरंजी संस्थनाला दिली ..
श्रीमंत बाजीराव आणि चिमाजीआप्पानी पुढाकार घेऊन घोरपड्यांना पुण्यात शनिवारवाड्या जवळ वाडा बांधुन दिला …अनुबाई आणि व्यंकटरावाना दोन आपत्ये , मुलगी वेणुताई आणि मुलगा नारायणराव …
मुलगा नारायणराव लहान असताना त्यांचे वडील म्हणजे व्यंकटरावाचे निधन झाले आणि संस्थानाचा कारभार नारायणरावा कडे आला …
पण आता खऱ्या कारभारी होत्या अनुबाई ….
अनुबाई कर्तृत्ववान होत्या , त्यांना राजकारणाची नुसती समज नव्हती तर त्या समर्थ पणे हाताळत होत्या …
करभारात लक्ष घालताना त्यांनी फक्त सदरे वर लक्ष ठेवले नाही तर मोहिमेवर जायला सुरुवात केली , श्रीमंत नानासाहेब पेशव्या बरोबर कर्नाटकची , सावनुर आणि इतर मोहीमा केल्या आणि नंतर बऱ्याच स्वतंत्र मोहिमा केल्या …मोहिमा करण्या मागे एकच उद्देश होता तो म्हणजे इचलकरंजी संस्थान वाढवणे … आणि त्यात त्या यशस्वी झाल्या … संस्थान भरभराटीला आले …
अनुबाई चे पुत्र नारायणराव लाडात वाढलेले होते , कारभार अनुबाईच पाहात असल्या मुळे मुलाच्या कर्तुत्वाला वाव मिळाला नाही , त्यात अनुबाईनी ते कायम आज्ञेत राहतील याची काळजी घेतली …त्या मुळे पुर्ण हयातीत अनुबाईचा कारभारावर एकछत्री अंमल होता ….
श्रीमंत माधवराव पेशव्याच्या काळात अनुबाईच्या मुलाने राघोबा दादाशी हात मिळवणी करुन आई विरुद्ध बंड पुकारले …पेशव्यांची मध्यस्थी आणि बाईंच्या कर्तृत्वा पुढे हे बंड फार काळ टिकू शकले नाही …
पुत्र म्हणला तर कर्तृत्वहीन म्हणले तर आई ने स्वतःच्या महत्वकांक्षेपायी कर्तृत्वाची वाढ होऊ दिली नाही , कारण काहीही असो अनुबाई संस्थान २५-३० वर्षे एक हाती आणि जेंव्हा गरज पडेल तेंव्हा पेशव्यांच्या मदतीने चालवत होत्या …
पेशवाईच्या अनेक पिढ्या पाहिलेली ही स्त्री , ज्यांचा नानासाहेब , सदाशिव भाऊ आणि राघोबा दादा वर वचक होता , थोरले माधवराव किँवा नारायणराव तर त्यांच्या समोर कोवळे होते … अशी ही पेशवाईतील आदरयुक्त दरारा असलेली स्त्री … एका चुकी मुळे पेशवाईतुन दुरावली गेली …
काय होती ती चुक ?
ती चुक होती सदाशिवभाऊ तोतया प्रकरणातली त्यांची भूमिका … कदाचित सदाशिवरावा च्या प्रेमा पोटी तोतयाला त्या भाऊ समजुन त्यांनी पाठिंबा दिला …त्यांच्या भुमिके मुळे श्रीमंत माधवराव आणि नाना फडणवीस विचित्र कात्रीत अडकले .. पण नाना फडणवीस बोलूनचालून मुत्सद्दी …त्यांनी मग खऱ्या खोट्याची शहा निशा करण्या करता तोतयाला १५ दिवस अनुबाईच्या घरात ठेवले … त्या नंतरही तोतयाच्या बाबतीत त्या गोंधळलेल्याच होत्या … पण तोतयाचे काय झाले हा इतिहास आहे ….पण त्यांची भुमिका त्यांच्या आणि पेशव्यांच्या नात्यात वितुष्ट देऊन गेली …यानंतर त्यांनी राजकारणातुन अंग काढुन घेतले … तीर्थयात्रा आणि घरगुती कामात गुंतवुन घेतले …
अशी ही थोर मुत्सद्दी , राजकारणी आणि पेशव्यांची माहेरवाशीण १७८३ ला तुळापुरला मृत्यु पावली … इतिहासाने इचलकरंजी संस्थानात त्यांची गौरवाने नोंद ठेवली …
बिपीन कुलकर्णी
संदर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )