‘..आणि हिशोब चुकता झाला..!’ – ऋचा मायी

पूर्वाला बळजबरी तो दवाखान्यात घेऊन गेला. आज सोक्षमोक्ष लावायचाच होता.
सात महिने पूर्ण झाले होते,आता गर्भपात अशक्य होता.पण तिच्या पोटात मुलगी आहे कळल्यापासून सासरचे अस्वस्थ झाले होते..
अखेरीस डॉक्टरच्या संगनमताने अवैध गर्भपाताच्या प्रयत्नात जीव गमावला तिने..
तिच्या मृत्यूने घाबरून हे क्रौर्य वैध ठरवायला गर्भधारणेची खोटी तारीख दाखवण्याची पूर्ण कागदपत्र बनवली होती.
अवैधरित्या गर्भपात करून लेकीचा जीव घेतल्याची तक्रार तिच्या हताश वडीलांनी  केली.
इकडे सासरच्यांना निर्दोष ठरवणारे सर्व खोटे पुरावे त्यांनी बनवले होते.
तेवढ्यात घराची झडती घेणाऱ्या चाणाक्ष पोलिसाची नजर अचानक भिंतीवरच्या कालनिर्णयकडे गेली..
सगळे हिशोब तारीखवार लिहिलेले होते.मातृत्वाची चाहूल लागलेला दिवस तर खास स्पार्कल पेनने सजवलेला.
पुढे दर महिन्याची धडधाकट वाढ आणि दोन महिन्यात येऊन ठेपलेली प्रसुतीची दिलेली तारीख.. सगळे दिवस ठळक नोंदवलेले होते ..
स्वयंपाक घर तिच्यावर लादून ढुंकूनही न पाहणाऱ्या घरच्यांच्या लक्षांत न आलेली तिच्या सुखदुःखाच्या नोंदीची ती हक्काची जागा होती.
भविष्यात गोड आठवणी रहाव्या म्हणून नोंदवलेली प्रत्येक तारीख,आज कोर्टात तिला न्याय मिळवून द्यायला नक्कीच पुरेशी होती..
©️ऋचा मायी.
ruchamayee.wordpress.com
(सदर कथा कालनिर्णय सोशल कथा स्पर्धेतील माझी प्रथम क्रमांक विजेती कथा)
कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.
कथा आवडल्यास नावासकट शेअर करावी.
कालनिर्णय तारखेइतकाच हिशोबाच्या आणि कित्येक महत्वाच्या नोंदींसाठी वापरला जातो.तुम्हाला अशी कधी एखादी नोंद अचानक कामाला नक्कीच आली असेल नक्की सांगा तुमचे अनुभव खाली दिलेल्य् कमेन्ट बाॅक्समधे.
धन्यवाद!