‘मी नाही मरणार कोरोनाने…!’
निलेशने मोहिते काकांना फोन केला ते त्याचे मॉर्निंग वॉक पार्टनर.फार दिलदार पण एकदम बेफिकीर माणूस !
‘जो भी होगा देखा जायेगा’ हा आयुष्याचा फंडा ठेऊन वयाची सत्तरी धडधाकट गाठलेली.
काका ४ दिवस झाले आले नाही वॉकला?कोरोनाला घाबरले वाटत?काय तुम्ही म्हणायचे मरणाला घाबरायचं नाही वगैरेचं काय झालं?
बाळा मरणाला तर मी आजही घाबरत नाही.पण आयुष्यात जे काही कमावलं ते समाजकार्याला लावलं उरलेला माझा एकमेव खजिना म्हणजे मी कमावलेली माणसं….
बायकोला नेहमी म्हणतो एकच इच्छा आहे की आपण मेल्यावर गाव गोळा व्हायला हवा आपल्याला पोहोचवायला. परवा निघालो फिरायला तर मला म्हणते, “तुमची शेवटची इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही.तुम्हाला गाव हवा होताना पोहोचववायला? पण कोरोनाने मेलात तर पोटचा पोर पण घाबरेल हो हात लावायला.
माझीसुद्धा विचारपूस करायला येणार नाहीत तुमची माणसं..उलट नावं ठेवतील तुमच्या बेजबाबदार पणाला.”
“खाडकन डोळे उघडले ना राव,आप मरगये दुनिया डुबगयी म्हणायचो पण हा चिमुकला विषाणू आपली आयुष्यभराची पुंजी झटक्यात घेऊन जाईल?
असा बरा जाईन मी…स्वार्थ म्हण हवं तर पण ह्या कोरोनाला काही मी मला नेऊ देत नाही.. जितके दिवस लागतील तितके दिवस गुपचूप बसेन घरात पण हेजग सोडून मी जाईन तर माझ्या माणसांच्या साक्षीने…!
निलेशने माॅर्निग वाॅकसाठी घातलेले बुट बाजूला काढून ठेवले…
©️ऋचा मायी.
ruchamayee.wordpress.com
कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.कथेत अथवा लेखिकेच्या नावात कोणचाहीबदल हा काॅपीराईट कायद्याचा भंग असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
काय वाटतं तुम्हाला? असते का अशी इच्छा माणसाची? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाने आपल्या मृत्यूनंतर आपल्यासाठी रडलच पाहिजे असं नसलं तरी निदान बेजबाबदार तरी म्हणू नये ना?
आपला सख्खा शेजारी सुद्धा आपली विचारपूस करायला येणार नाही असा दुर्दैवी शेवट नको ना व्हायला?
आपल्या हातात तर काहीच नसतं,जे लोकं ह्या कोरोनाच्या विळख्यात त्यांची काहीही चूक नसताना आले त्यांना श्रद्धांजली म्हणून तरी आपण काही दिवस घरांत थांबणे अत्यावश्यक आहे ना? आपला एका चुकीची शिक्षा आपल्या कुटुंबाने भोगू नये..
काय वाटतं तुम्हाला ? नक्की नोंदवा तुमचं मत.
धन्यवाद!