‘आज सगळ्यांनाच हवा आहे एक….!’ – ऋचा मायी

‘आज सगळ्यांनाच हवा आहे एक….!’

Adv.Rucha Mayee.

आज आम्ही काय काय केलं दिवसभर? रोज सगळ्यांनी फोटो टाकायचे.मग त्यावर इतरांनी काहींना काही गमती जमती करायच्या.. जवळ जवळ सगळ्याच नशीबवान लोकांच्या घरात हेच चित्र दिसत आहे.. हो नशीबवानच!

ते सगळे जे काही न कमावता घरात बसू शकत आहेत, अर्थात पै पै साठवून बचत करून जगलो आजपर्यंत म्हणून कुठेतरी हुश्श म्हणत आहेत.देवांनी ही लक्झरी ज्यांना दिली ते नशीबवान…!

मनातल्या मनात असा काळ पुन्हा येऊ नये ही भिती प्रत्येकालाच भेडसावत असूनही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याला तो आनंद दाखवायचा प्रयत्न करत आहे.

आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे,आपापल्या कुवतीनुसार…

खरंच सगळ्यां घरांना एवढी मजा करता येत आहेका?
आज सकाळी सकाळी फोन वाजला. ऑफीसमध्ये पूर्वी सफाईचं काम करणाऱ्या मुलीचा.
घर बदलल्या मुळे आता ती माझ्याकडे येत नव्हती.
मला वाटलं बहुदा काहीतरी पैशाची अडचण असावी.
मी विचारलं, “काय गं राजश्री बरे आहेत ना सगळे घरात ?”
आजकाल कोणाचाही फोन आला की ठरलेला प्रश्न झालाय…
ती म्हणाली, “ढकलतोय ताई एक एक दिवस.टीचभर घरात पूर्ण दिवस राहायचं..जीव गुदमरतो,आता जवळपास महिना झालाना.”

मला वाटलंच की तिच्याजवळचे पैसे नक्कीच संपले असणार, कामाला होती तेव्हा कधी उधार मागितले नाही,आता ती आपल्याकडे काम करत नाही म्हणल्यावर पैसे मागायला संकोच होत असणार… गरीब असली तरी स्वाभिमानी होती ती मला माहित होतं..

स्वाभिमानी माणसाला एकदम आर्थिक मदत विचारायलाही नको वाटतं,न जाणो दुखावली गेली तर ?

मग अशाच चौकशा करायला सुरुवात केली तेव्हा ती एका डॉक्टरच्या घरी आता त्यांच्या मुलाला सांभाळते असे तिने सांगितले.

पण सध्या सगळी ये जा बंद असल्यामुळे तिला त्यांनी येऊ नकोस सांगितले होते.

“नवरा काय रोज घरात पडलेला असतो.टीचभर खोलीत काम तरी किती ?पसाराही घालायला जागा नाही त्यामुळे सकाळी २तासात स्वयंपाकापासून सगळं होऊन जातं मग दिवस खायला उठतो.

म्हणाली आम्ही टिव्ही वर बघतो लोकं काय काय करत आहेत दिवसभर…
पण एकमेकांबरोबर वेळ कसा घालवायचा हे कधी माहितच नाही आमच्यासारख्याना..आजवर फक्त दिवसाच्या शेवटीझोपायच्या वेळेसच सर्व एकत्र घरात असतो आम्ही.

उभ्या आयुष्यात कधी अशी वेळ येईल असे वाटले नव्हते हो ताई.किती वाटायचं आपण पण आरामाचं आयुष्यं जगावं.
हे रोज रोज कामावर जायचं एक एक पैसा जोडायचा.घरची किट किट वेगळीच… कधी सुट्टी मिळेल? असं वाटायचं. पण आता..”.

असं म्हणून रडायला लागली ती फोनवरच..

मग मी शेवटी न राहवून म्हणलंच, “राजश्री पैसे घेऊन जा माझ्याकडून उद्या,घरासाठी लागणारा महिनाभराचा किराणा तरी भरून घे.”

तशी ती म्हणाली, “ताई नाही हो पैसे…

मी तिला मधेच तोडत म्हणाले, “हवं तर घेईन कधीतरी परत तुझ्याकडून पण नाही म्हणू नकोस..प्लिज ”
तशी म्हणाली मला पैसे नकोत सध्या आहेत. पण मला एक गोष्ट हवी ती द्यालका? कळकळीची विनंती आहे.

अगं विनंती कशाला? मला देण्यासारखं असेल तर नक्कीच देईन. पहिल्यांदा तर काहीतरी मागितलंस तू!

तशी ती म्हणाली, “मी एक दिवस तुमच्या घरी येऊन सगळं काम करून जाऊ का ?एकच दिवस येउद्या !

तसं मी म्हणलं, “अगं मी सांगितलं ना मी उधार पैसे देत आहे असे समज, त्यासाठी माझं काम करायची अजिबातच गरज नाहीये. ”

ती म्हणाली, “ताई पैसे आहेत हो माझ्याकडे देवाच्या कृपेने.
मला एक कामाचा दिवस हवा आहे,एकच द्या पण द्या तुमच्या ओळखीत कोणी असेलच ना मोठ्ठा माणूस त्यांना सांगून बघाना..”

मला अचानक लक्षात आलं की आज आमच्या दोघींची एकच गरज होती. आमचीच नाही जगातल्या बहुतांश लोकांची अचानक एक सामूहिक गरज बनली आहे…….

श्रीमंत,गरीब,जात,धर्म कोणाचाही काही असो सगळे जण एकच गोष्ट मिस करत आहेत.ज्याचा आजपर्यंत कंटाळा केला कित्येकांनी,त्याला कसं टाळता येईल? हा प्रयत्नही कधीना कधी केलाच असेल..

एक हक्काचा वर्कींग डे… तिने पहिल्यांदाच काहीतरी मागितलेली गोष्ट होती.

पण नाही देऊ शकले मी तिला.ते धोकादायक होते आमच्या दोघींच्या आरोग्यासाठी.

कारण नियम आज पहिल्यांदाच तिला आणि मला सारखेच पाळायचे होते .

एक आनंदी वर्कींग डे अनेकांच्या आयुष्यात पटकन परत यावा म्हणून…
©️ऋचा मायी.
ruchamayee.wordpress.com
साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे /कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.कथेमध्ये अथवा लेखिकेच्या नावांमध्ये कोणाचाही बदल हा कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा असेल.

नावासकट जशीच्या तशी लिखित स्वरूपात कथा शेअर करण्यास हरकत नाही.

कशी वाटली कथा ?आज सगळ्यांनाच हा दिवस पटकन हवा आहे. आज आपण जगातल्या सगळ्यात सुरक्षित जागी आहोत ते म्हणजे आपलं घर.

मग तरीही माणसाला ते नको का आहे कारण मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपला आनंद,दुःख जोपर्यंत आपण इतरांशी वाटत नाही तोपर्यंत त्याचा आनंद घेता येत नाही. ते सगळं थांबलं आहे म्हणून ही चुटपुट.

हे संपणारच नक्कीच कारण ज्या गोष्टीला सुरुवात आहे त्याला अंत असतोच.

तुम्हाला पण हवा आहेना पटकन एक वर्कींग डे ?
मग कोणच्याही ओळखीचा,दबावाचा तुमच्या सामाजिक पदाचा किंवा धार्मिक भावनेचा वापर करून कृपया नियम मोडू नका.

वर्कींग डेची सुरुवात लवकरच होईल पण त्यासाठी ही सक्तीची सुट्टी पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे ही ईश्वर चरणी पार्थना 💐🙏🏻