*|| बस्त्यात साऱ्या सोंगट्याच ||*
खेळ जेंव्हा संपतो
राजा – प्यादे एक होतात
पटावर नसताना……बस्त्यात
त्या साऱ्या सोंगट्या असतात….
बाहू बली उणी – गुणी
पटाच्याच जागी खुणी
हेवे दावे मान मार्तब
नंतर हो पुसतंय कुणी??
तिरक्या चालीचे उंट
काळे पांढरेच पळतात
तिथं ही शिपाई पुढे राहून
मान आपलीच मारतात…
राजा सदा पटावर…
घोडा हत्ती पुढं करतो
त्यांनी नांगी टाकल्यावर
तो ही तर हतबल ठरतो…
पटावर ही दुसऱ्याच्या मक्ती
स्वतः साठी एक घर सक्ती
कितीही असली इच्छा शक्ती
मूठ सदैव रिकामी – रिक्ती…
सर्व ठिकाणी कारभार
वाझिराची डोकी करतात…
बाकी सारे हाथ रुमाली
चाकर मानी ठरतात…
पटावर नसताना……बस्त्यात
त्या साऱ्या सोंगट्या असतात….
म्हणून पटावर असतांना
संस्कारी असावं लागतं
मग पटावर नसताना
नक्षीदार पेटीचं भाग्य लाभतं…
नक्षीदार पेटीचं भाग्य लाभतं…
नक्षीदार पेटीचं भाग्य लाभतं…
*|| बोबडे बोल ||*
