पावनखिंड 43

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ४३* 🔰

 

 

आषाढी पौर्णिमेचा दिवस असूनही दाट धुक्यामुळं चांदणं जमिनीवर उतरत नव्हतं. घोंगावणारं वारं गडावर थैमान घालत होतं. कोणत्या क्षणी पाऊस कोसळेल, याचा भरवसा नव्हता.

सज्जा कोठीत राजे आपल्या साथीदारांसह बसले होते. राजांनी विचारलं,

‘किती सांगाती निवडलेत?’

‘राजे! संगती सहाशे धारकरी आहेत. दोन पालख्यांसाठी तीस चक्री भोई आहेत. त्यांखेरीज सामान नेण्यासाठी दहा जण आहेत. पुऱ्या वाटेवर जबाबदार माणसं पेरली आहेत. आपण मुळीच चिंता करू नये.’

‘बाजी! तुमच्यासारखी भावंडं असल्यावर काळजी कसली?’ राजे म्हणाले.

सदर महालाच्या आजूबाजूला असलेल्या छपऱ्यांतून सारे धारकरी बसले होते. नाचण्याची भाकरी आणि झुणका साऱ्यांना वाढला जात होता. गडावर रात्र उतरली. रात्र वाढत होती. मशाली, टेंभे, पलोते जळत होते. स्वप्नामध्ये वावरावे, तसे सारे दाट धुक्यातून वावरत होते. वादळी वारा अंगावर काटा उभा करीत होता. पण त्याची जाणीव कुणालाही राहिली नव्हती.

 

एक प्रहर रात्र उलटली आणि महादेव राजदिंडीच्या वाटेनं गडावर आला. त्यानं बाजींना एकच सांगितलं,

‘चला!’

राजे सदर महालाबाहेर येताना त्र्यंबकजी व गंगाधरपंतांना म्हणाले,

‘त्र्यंबकजी, गड लढवता येईल, तेवढा लढवा. जीव राखून शत्रू सामोरे जा. प्रसंग पडला, तर बेलाशक गड शत्रूच्या हवाली करा.’

‘गड शत्रूच्या हवाली करा?’ त्र्यंबकजी म्हणाले, ‘मग आम्ही किल्लेदार कसले?’

‘असा खोटा अभिमान बाळगू नका. पंत, तुम्ही असला, तर दहा गडांची किल्लेदारी देता येईल. पन्हाळा आज आपल्या हातून गेला, तर त्याचं दुःख कसलं? परत तो घेता येईल. विवेक सोडून काही करू नका.’

राजे सदर महालाबाहेर आले. राजांच्या संगती मशालधारी चालत होते. पालखीत बसण्याआधी राजे थांबले. त्यांनी पाठीमागच्या पालखीकडं पाहिलं. राजांच्या वेषात मागं शिवा उभा होता. शिवा पुढं झाला. त्यानं राजांच्या पायाला हात लावून वंदन केलं. राजांनी शिवाला मिठी मारली. राजांना काही बोलवत नव्हतं. शिवाच्या पाठीवरून हात फिरत होते.

बाजी म्हणाले,

‘राजे! वेळ नको. पालखीत बसावं.’

राजे पालखीत बसले. पालखी उचलली गेली. पाठीमागच्या पालखीसमोर शिवा उभा होता. बाजींनी सांगितलं,

‘बैस.’

‘नको, मी चालतो.’

‘बैस म्हणतो ना! पाऊस केव्हा कोसळेल, हे सांगता येणार नाही. तू भिजता कामा नये.’

दोन्ही पालख्या उचलल्या गेल्या. दुतर्फा धारकरी चालत होते. पावसाळी चिखलाची वाट असल्यानं, कुणाच्याही पायांत वहाण नव्हती. अनवाणी पावलांनी सारे चालत होते. उत्तरेचा राजदिंडीचा दरवाजा आला. सोबतीला आलेले मशालकरी थांबले. दिंडी दरवाज्यापर्यंत पोहोचवायला आलेले गंगाधरपंत व त्र्यंबकजी यांना राजे म्हणाले,

‘त्र्यंबकजी, आम्ही येतो. गड संभाळा.’

बाजी म्हणाले,

‘चला.’

दोन्ही पालख्यांवरची अलवानं सोडली गेली. राजांची पालखी सर्वांसह गड उतरत होती

मशाली केव्हाच मागं पडल्या होत्या. दाट धुक्यातून दोन पालख्या सावरत मावळे धावत होते.

 

गडाच्या पायथ्याशी सारे आले आणि पाऊस कोसळू लागला. उभ्या पावसातून चिखल, पाणी तुडवत सारे धावत होते. राजांच्या पालखीच्या दांडीवर हात ठेवून बाजी पळत होते. कवारखिंड नजीक आली. कवारखिंडीच्या दोन्ही बाजूंच्या डोंगरांवर सिद्दीचे मेटे होते, याची साऱ्यांना कल्पना होती. ते मेटे ओलांडले की, पुढची वाट सुखरूप होती. कवार खिंडीतला ओढा खळाळत वाहत होता. दाट रानानं भरलेल्या त्या मुलखातून डोंगरकडेनं दोन्ही पालख्या जात होत्या.

त्याच वेळी आवाज उठला,

‘हुश्शारss…. कौन है?’

बाजी म्हणाले,

‘चला! थांबू नका.’

राजांची पालखी पळवली जात होती. राजांची पालखी पुढे गेली आणि डोंगरावरून मशाली खाली उतरू लागल्या. बाजींनी धारकऱ्यांना इशारत दिली. पाच-पंचवीस धारकरी दोन्ही बाजूंच्या रानात शिरले आणि काही वेळातच घोंगावणाऱ्या वाऱ्यातून, दाट धुक्यातून आर्त किंकाळ्या उठल्या,

‘दगा s दगा ss’

बाजी शिवाच्या पालखीकडं धावले. पालखी क्षणभर थांबली. बाजी म्हणाले,

‘शिवा, आता तुझी वाट वेगळी.’

भर अंधारात कुणी कुणाला दिसत नव्हतं. बाजी अंदाजानं पुढं झाले. त्यांनी शिवाला मिठी मारली. शिवा म्हणाला,

‘धनी! काळजी करू नका! तुम्हांला राजे मानतात. एकच आशीर्वाद द्या.’

‘बोल!’ घोगऱ्या आवाजात बाजी म्हणाले.

_’मरताना भीती वाटायला नको.’_ शिवाचे शब्द उमटले.

बाजींना हुंदका फुटला. मन घट्ट करून त्यांनी पालखीवरचं अलवान खाली ओढलं. भोयांना आज्ञा दिली. शिवाची पालखी धारकऱ्यांच्यासह उलट वाटेला लागली.

पुढं गेलेली राजांची पालखी गाठण्यासाठी बाजी आपल्या धारकऱ्यांसह धावू लागले.

 

‘शिवाजी भाग गयाss? कौन कहता है, शिवा भाग गयाss’

सिद्दी जौहर आपल्या पलंगावरून उठत किंचाळला. विझलेल्या साऱ्या मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. मद्यानं धुंद झालेला सिद्दी नुकताच कुठं निद्राधीन होत होता. तोच शिवाजी पळून गेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली. संतप्त सिद्दी उभा होता. डोळे आरक्त बनले होते. ज्यानं ही बातमी आणली, त्याचे गाल सिद्दीच्या थपडा-बुक्क्यांनी रंगले होते.

फाजल, मसूद धावत डेऱ्यात आले. सिद्दी जौहरसमोर येताच फाजल म्हणाला,

‘तरी मी सांगत होतो….’

‘खामोश!’ सिद्दीची संतप्त नजर वळताच, फाजलचे पुढचे शब्द घशातच राहिले. सिद्दीची नजर मसूदवर वळली. तो म्हणाला,

‘मसूद! शिवाका पीछा करो! जिंदा या मुर्दा, त्याला घेऊन आल्या खेरीज, आमच्यासमोर येऊ नका. जाsss’

छावणीची धावपळ उडाली. मसूदनं भर रात्री हजार घोडेस्वार, पायदळ जमा केलं. भर पावसात राजांच्या मागावर तो धावू लागला. घोंगावणाऱ्या वादळ-वाऱ्याची, उभ्या पावसाची तमा न बाळगता मसूद त्या चिखल-राडीतून घोडदौड करीत होता. पेटलेल्या शेकडो मशाली अमावस्येला भुतांच्या काड्या नाचाव्यात, तशा नाचत होत्या.

अचानक पुढं गेलेला कोणी तरी किंचाळला,

‘दुश्मन ss’

मसूदला अवसान चढलं. मसूदच्या वाटेनं येणाऱ्या पालखीला गराडा घालण्यात आला. चिंब भिजलेला मसूद पायउतार झाला. पालखीभोवती मशाली आणल्या गेल्या. पालखीचं अलवान उचललं गेलं. स्मितवदनानं बसलेला शिवा सर्वांच्या नजरेत आला.

‘शिवाजी राजे!’ मसूद उद्गारला.

‘हां!’ शिवा म्हणाला.

मसूदला काय बोलावं, हे कळेना. आपल्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी निपटत तो म्हणाला, ‘आपल्याला छावणीकडं नेण्यासाठी, आम्ही आलो आहोत.’

‘आम्ही तिकडंच येत होतो! ठीक आहे. चलाs’

पालखीला मसूदनं गराडा दिला. पालखी सिद्दीच्या तळाकडं चालू लागली.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*