पावनखिंड 26

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : २६* 🔰

 

 

शिवाजीच्या पारिपत्यासाठी आदिलशाहीनं खर्चाचा हात राखून ठेवला नव्हता. शेकडो लहान-मोठ्या तोफा, वीस हजारांची फौज, शंभर हत्ती, शेकडो उंट, दारूगोळा, बाड-बिछायत आणि अगणित संपत्ती अफजलखानाच्या हवाली केली होती.

अफजलखानाच्या पुढं शिवाजीचा पराभव अटळ होता. विजापूरची बडी बेगम शिवाजीचा पराभव ऐकण्यास उत्सुक होती. एके दिवशी अफजलखान शिवाजीस पिंजऱ्यात घालून दरबारात दाखल होईल, हे स्वप्न बडी बेगम पाहत होती. एकदा शिवाजी हाती आला की, दरबारात वर्चस्व गाजवणाऱ्या फर्जंद शहाजीराजांची मिजास उतरेल आणि शिवाजीच्या प्राणाची तो भीक मागेल, यात बेगमला संशय नव्हता.

 

-आणि एके दिवशी आदिलशाहीच्या दरबारावर वीज कोसळावी, तशी बातमी आली.

आलीशान अफजलखान माहमदशाही पैगंबरवासी झाला.

शिवाजीनं खानास ठार मारलं.

फौजेचा धुव्वा उडाला.

सारी दौलत लुटली गेली.

त्या बातमीनं बड्या बेगमचे डोळे विस्फारले गेले. तिचं भान हरपलं.

अफजलखानाला मारलं!

शिवाजीनं?

कोठेतरी गफलत होत आहे.

मोठी गफलत होत आहे.

झूट! ये कभी नहीं हो सकता! कुठं अफजल आणि कुठं तो शिवाजी!

मशालीपुढं काजवा कधी टिकतो?

काजव्यानं झेप घेतली, म्हणून मशाल कधी विझेल?

मग अफजलचं असं कसं झालं?

बडी बेगम भानावर आली. तिचे डोळे विस्फारले होते. आपल्या बुरख्याची जाणीव तिला राहिली नव्हती. तिला परत सारं आठवलं आणि कानांवर हात ठेवत ती किंचाळली,

‘नहीं ss नहीं ss कभी नहीं ss ऐसा हो ही न सकता ss’ बडी बेगमनं आज्ञा दिली, ‘निकल जाव मेरे सामनेसे s झूटे कहीं केss’

बडी बेगम हुंदके देत दरबारातून उठली.

सारा दरबार चिकाच्या पडद्याआडून उठणारा तो चीत्कार ऐकत होता.

झोकांड्या देत बडी बेगम आपल्या अंतर्गृहात गेली आणि तिनं पलंगावर धाडकन् अंग टाकलं. बड्या बेगमचं दुःख तिच्या नावाप्रमाणेच मोठं होतं.

साऱ्या विजापूर शहरावर शोककळा पसरली. नगारखान्याची नौबत बंद झाली. दरबार बंद झाला. बड्या बेगमेनं अन्नपाणी वर्ज्य केल. आणि शाही तख्तावर चादर पांघरली गेली. साऱ्या शहरभर सुतकी वातावरण पसरलं. घरोघरी बिब्या आणि बेगमा यांचा धाय मोकलून आक्रोश उसळला.

बातमीपाठोपाठ त्या बातमीचं सत्य स्वरूप दाखविण्यासाठीच की काय, अफजलखानाचा मुलगा फाजलखान अंगावरच्या वस्त्रानिशी विजापूरच्या दरबारात हजर झाला.

त्या बातमीनं चिंताग्रस्त झालेली बेगम विचार करीत असतानाच तिसऱ्या दिवशी नवी बातमी येऊन थबकली. शिवाजीचा सरनौबत नेताजी पालकर यानं लक्षमेश्वरापर्यंतची लुटालूट केली होती.

पाठोपाठ बातमी आली, शिवाजी अठरा दिवसांत एकवीस गड घेऊन पन्हाळ्यापर्यंत पोहोचला होता. विजापूरवर तो धाड घालणार, यात शंका उरली नव्हती.

त्या बातमीनं बड्या बेगमचा धीर सुटला. तिनं तातडीनं रुस्तुम-ए-जमान आणि फाजलखान यांना दहा हजार फौज देऊन शिवाजीवर सोडलं. त्यांच्या संगती मलिक इतबार, फत्तेखान, घोरपडे, सर्जेराव घाटगे वगैरे सरदार होते.

त्यांना निरोप देताना हताश झालेली बडी बेगम म्हणाली,

‘कुछ भी हो! पण तो काफर शिवाजी विजापूरपर्यंत येत नाही, येवढी काळजी घ्या.’

विजापूरहून रुस्तुम-ए-जमान आणि फाजलखान फौज-फाटा घेऊन बाहेर पडले. पण बड्या बेगमेला त्यांचा विश्वास राहिला नव्हता.

 

शिवाजीराजांनी कोल्हापूर जिंकलं होतं. सायंकाळच्या वेळी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते आपल्या छावणीत परतले होते. राजांच्या पालीसमोर शेकोट्या पेटल्या होत्या. बाजी, फुलाजी, आबाजीप्रभू यांच्यासह नेताजी, तानाजी, बहिर्जी ही मंडळी राजांच्या भोवती गोळा झाली होती. अठरा दिवसांच्या मोहिमेचा ताण कुणाच्याही मुखावर नव्हता. आलेल्या विजयानं सारे आनंदित होते.

राजांची नजर बाजींच्याकडं वळली,

‘बाजी! आता पन्हाळगड तुमचा! तो आपल्या हाती आला, तर आदिलशाहीची एक कड आपल्या हाती संपूर्ण येईल. उद्या आपण पन्हाळगडावर चालून जाऊ.’

अठरा दिवसांत राजांना पडलेला ताण बाजींच्या ध्यानी येत होता. ते म्हणाले,

‘राजे, आज्ञा झाली, तर….’

राजे हसले. ते म्हणाले,

‘ठीक आहे. तुम्ही पन्हाळ्याला वेढा घाला. शक्य तो सामोपचारानं गड हाती येतो, का पाहा. ते जमलं नाही, तर आततायी प्रकार न करता आम्हांला वर्दी द्या. आपण गड काबीज करू. तुमचा निरोप येईपर्यंत आम्ही कोल्हापूरची आणि छावणीची व्यवस्था लावून घेऊ.’

‘जशी आज्ञा!’ बाजी आनंदानं म्हणाले.

‘तुम्हांला हवा, तो फौजफाटा घेऊन तुम्ही जा.’

राजांचा निरोप घेऊन बाजी गेले.

बहिर्जींच्या मुखावरची चिंतेची रेघ बघून राजांनी विचारलं,

‘काय, बहिर्जी! मनात काय आहे?’

‘काय न्हाय, जी!’ बहिर्जी म्हणाला, ‘पन पन्हाळा येवढा साधा गड न्हाई. लई मजबूत हाय.’

‘बहिर्जी! गड मजबूत असून चालत नाही. माणसाचं मन मजबूत असायला हवं. खानाच्या मृत्यूची बातमी पुढं पळत होती आणि आम्ही त्यामागून धावत होतो. कमी बळ आणि खचलेली मनं यांमुळं आम्हांला विजय साधता आला. बाजी नुसते वीर नाहीत. ते बांदलांचे प्रधान होते. जिथं शौर्य आणि बुद्धिमत्ता वास करते, तिथं विजयच प्राप्त होतो.’

बहिर्जी काही बोलला नाही. राजे आपल्या तंबूत विश्रांतीसाठी गेले.

हवेतला गारवा वाढत होता. राजांच्या तंबूसमोरची शेकोटी प्रज्वलित केली जात होती. वाढत्या रात्रीबरोबर छावणीची वर्दळ मंदावत होती. राजांची छावणी विसावली होती.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*