पावनखिंड 20

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

🔰 *भाग : २०* 🔰

रोहिडा किल्ल्याच्या वाड्यात, सदरेवर मल्हारबा देशमुख बसले होते. तिशीच्या वयाच्या देशमुखांची मुद्रा त्रस्त दिसत होती. देशमुखांचे कारभारी गंगाधरपंत सामोरे उभे होते. वाड्याच्या पायऱ्यांखाली आठ-दहा माणसं उभी होती.

देशमुख गर्जले,

‘दोन वर्ष बेपत्ता! आनि आज भडवे बलुतं मागायला आले. ठेवल्यात त्यांच्या बापानं. गंगाधरपंत, त्यांच्या पदरात एक दाणा टाकू नका.’

‘जी, धनी!’ गंगाधरपंत उद्गारले.

पायरीखाली उभा असलेल्यांतला ज्ञानू लोहार म्हणाला,

‘धनी, पाठीवर मारा पन पोटावर मारू नगासा.’

‘मग कशाला शेण खायला गेला होता?’

‘धनीs तुमीच सांगितलासा, म्हनूनss’

‘मी नव्हे, त्या बाजी देशपांड्यांनं सांगितलं. आनि तुमी ते ऐकलासा. जाण राहिली नाही तुम्हांला. बलुतं आमचं आणि चाकरी त्या शिवाजीची.’

‘शिवाजीराजं व्हतं, म्हनून दोन वर्सं मानसं जगली. त्यो देवमानूस.’ मुकुंदा गवंडी धीर करून म्हणाला.

‘एवढा मान चढला?’ मल्हारबा उठत म्हणाले, ‘कोण आहे, रे, तिकडं या हरामखोरांच्या पाठी सोलून काढायला?

सेवक धावले.

भीतीग्रस्त माणसं त्या आज्ञेनं उभ्या जागी बसली. पण अपेक्षेप्रमाणे काही घडलं नाही. सारे सेवक वाड्यासमोरच्या रस्त्याकडं बघत होते.

बाजींची रूबाबदार मूर्ती वाड्याकडं चालत येत होती. बाजींना येताना पाहताच मल्हारबांचा सारा नूर पालटला. बाजी सदरेखाली जमलेल्या मंडळींच्याकडं नजर टाकून पायऱ्या चढले. त्यांनी मल्हारबांना नमस्कार केला.

‘बाजी! तुम्हांला आठवण झाली. बरं वाटलं!’

बाजींनी उत्तर दिलं,

‘तसं नाही, धनी! जासलोड गडाच्या कामगिरीवर होतो. तेव्हा…’

‘तेच ते!’ देशमुख म्हणाले, ‘आता आम्ही धनी कुठले? आता तुमचे शिवाजीराजे धनी.’

त्या असंयमी उद्गारांनी बाजींना दुःख झालं. आपली अस्वस्थता प्रगट न करता त्यांनी सांगितलं,

‘आम्ही आपली चाकरी करत आलो. ते इमान आम्ही विसरलो नाही. आपणच आमचे धनी. पण शिवाजी आमचे राजे आहेत.’

‘तुमचे राजे?’

‘माझेच नाहीत; आपलेही!’ बाजींचा आवाज थोडा कठोर झाला.

‘ते तुमचे राजे असतील. आमचे नाहीत!’ मल्हारबा त्याच जिद्दीनं उद्गारले.

‘धनी! तुम्ही लहान आहात! तुमच्या वडिलांनी मला दिवाण नेमलं होतं. त्या वडिलकीच्या नात्यानं मी आपल्याला विचारतो. जेव्हा शिवाजी राजांनी हा गड ताब्यात घेतला, तेव्हा तुम्हांला-आम्हांला वतन काढून घेऊन बेघरदार करायला त्यांना कोणी मज्जाव केला होता? तसं केलं असतं, तर तुम्ही काय करणार होतात?’

‘काय म्हणालात?’ मल्हारबा उद्गारले.

‘येवढंच नव्हे, तर गड, मुलूख काबीज करूनही राजांनी तुम्हांला मानलं…’

‘मानलं! उपकार केलेत नाहीत!’ मल्हारबा म्हणाले, ‘आदिलशाहीला कळवलं असतं, तर?’

‘तर काय झालं असतं?’ बाजींचा संयम ढासळला, ‘आजवर आदिलशाहीतच हा गड होता ना? आपल्या पिताजींनी अनेक वेळा शिवाजींच्या विरूद्ध कागाळ्या नेल्या. पण त्या दरबारची एकही माशी जागची हलली नाही. उलट, शिवाजी राजांनी गड जिंकूनही तुमच्या ताब्यात दिला. तुमची आमची वतनं सुरक्षित केली. गड सोडताना त्यांनी आपला एकही माणूस गडावर ठेवला नाही, आणि त्याची कदर आपण ही करता?’

बाजींच्या त्या रोखठोक बोलण्यानं मल्हारबा थोडे भानावर आले होते. त्यांच लक्ष पायरीखाली बसलेल्या इसमांच्याकडं गेलं. परत त्यांचा राग जागा झाला.

‘त्यांची माणसं! पण आमची माणसं पळवली, त्याचं काय? बलुतं आम्ही देणार आणि आमची माणसं…’

‘राजे नसते, तर तुम्ही मालक बनला नसता.’ बाजींनी सांगितलं, ‘आणि या माणसांना पोसण्याची ताकद तुम्हांला राहिली नसती. गंगाधरपंत, हा काय मामला आहे?’

गंगाधरपंत हात जोडून म्हणाले,

‘हे गडाचे बारा बलुतेदार. जासलोड गडाच्या उभारणीच्या कामासाठी तिकडं गुंतले.’

‘आम्हीच सांगितलं होतं.’ बाजी म्हणाले.

‘त्यापायीच धन्यांना राग आला. ते सारे आज बलुतं मागायला आलेत.’

‘त्यांना बलुतं द्या.’ बाजींनी आज्ञा दिली.

‘हे तुम्ही सांगता?’

‘धनी, मी तुमची आज्ञा मोडत नाही. पण बलुतं दिल नाही, तर ही माणसं जगणार कशी? या माणसांचा शिवाजी राजांशी परिचय झाला आहे. शिवाजी राजे आता या भागातला माणूस ओळखतात. ती तक्रार राजांच्या कानांवर गेली, तर आपली गय केली जाणार नाही.’

‘शिवाजी राजे! शिवाजी राजे!’ देशमुख वैतागले, ‘कोण शिवाजी राजे! आम्ही चांगले ओळखतो या शिवाजी राजांना. आमच्या वडिलांचा मृत्यू आम्ही विसरणार नाही.’

‘इथंच राजांचं मोठेपण आहे! त्यांनी सारं विसरून तुम्हां-आम्हांला वतनं परत दिली. पण तुमच्या मनातली कटुता अजून सरत नाही. राजे मोहनगडावर आले होते.’

‘मोहनगड?’ देशमुखांनी विचारलं.

‘जासलोड गडाचं नाव मोहनगड! राजांनी ठेवलं आहे. राजे तुमची आठवण काढीत होते.’

देशमुख घाबरले.

‘आमची आठवण! मग तुम्ही काय सांगितलं?’

‘घाबरण्याचं कारण नाही.’ बाजी हसून म्हणाले, ‘आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही गडाच्या उभारणीत गुंतला आहात.’

‘बरं केलं.’ देशमुख म्हणाले, ‘बापाला ठेच लागली, तर मुलानं शहाणं व्हाव!’

बाजी काही क्षण काही बोलले नाहीत. नंतर ते म्हणाले,

‘धनी! राजांनी आज्ञा केली आहे — बांदलांची शिबंदी जेवढी वाढवता येईल, तेवढी वाढवा.’

‘वाढवा! आणि त्याचा खर्च कोण देणार?’

‘अर्थात राजे!’ बाजी विश्वासानं म्हणाले, ‘त्यात कसूर होणार नाही. किती केलं, तरी तो राजा आहे. आपण त्यांची प्रजा.’

‘आम्ही म्हणत नाही.’ देशमुख म्हणाले.

दोन दिवस गडावर मुक्काम करून, गडाची सर्व व्यवस्था देशमुखांना सांगून, बाजी आपल्या सिंद गावी परतले.

*🚩 क्रमशः 🚩*