*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : १३* 🔰
बाजी-फुलाजी राजांना निरोप देऊन वाड्याकडं येत असता संगती तात्याबा म्हसकर नाही, हे त्यांच्या ध्यानी आलं. त्यांनी वळून पाहीलं, तो तात्याबा गावाच्या दिशेनं चालत होता. बाजींनी हाक मारली,
‘तात्याबा ss’
त्या हाकेनं तात्याबा वळला. माघारी येऊन तो बाजींना म्हणाला,
‘काय, धनी!’
‘निरोप न घेता घरी निघालास? चल सदरेवर.’
‘जी!’ तात्याबा म्हणाला.
सारे सदरेवर आले. बाजी म्हणाले,
‘तात्याबा, तुला उगीच हाक मारली नाही. शिवाजीराजांनी पहिली कामगिरी आमच्यावर टाकली आहे. जासलोड गड दुरूस्त करायला हवा.’
‘व्हय, जी!’
‘व्हय, जी, म्हणून चालायचं नाही. तो गड कसा आहे? काय करायला हवं?’
‘ते म्या काय सांगनार?’ तात्याबा म्हणाला.
‘तू नाही, तुझा बाप सांगेल!’ बाजी गर्जले, ‘तात्याबा, आता ही सोंगं चालायची नाहीत.’
तात्याबा हसला,
‘धनी, गड नामी हाय. मागिंदी इजापूरचा फाजखान किल्लेदार व्हता. त्योबी कट्टाळला आनि निघून गेला.जासलोड वस पडला. पाच-पंचवीस घरटी गडावर हाईत. विठोजी गडकरी म्हणून शिलेदार व्हता. त्योच आता किल्लेदार हाय.’
‘अस्सं!’ बाजी म्हणाले, ‘उद्या आमची बांदलांची शिबंदी गडावर पाठवू. ते पुढं जाऊन देखाभाल करतील. तिथली सोय झाली की, आपण जाऊ.’
‘आपन?’ तात्याबा उद्गारला.
‘हं, आपण! तात्याबा, आता तू पुढं; आम्ही मागनं. राजांनी गडाची पहिली कामगिरी सांगितली, ती नामी झाली पाहिजे.’
‘न व्हायला काय झालं? करूया की!’
जासलोड गडाचे किल्लेदार विठोजी गडकरी आपल्या घराच्या कट्ट्यावर बसून किल्ल्याची वर्दळ बघत होते. विठोजीचं वय साठीच्या घरात गेलं होतं. डोक्याचे पांढरे तुरळक केस अस्ताव्यस्त वाढले होते. गालावर उतरलेल्या भरदार पांढऱ्या कल्ल्यांखाली दाढीचे पांढरे खुंट उगवले होते. ओठावरच्या पिळदार मिशीला पीळ भरीत विठोजी गडाची वर्दळ पाहत होते. विठोजीची मुद्रा त्रस्त दिसत होती. त्याच वेळी त्यांची मुलगी सखूबाई बाहेर आली. विठोजींनी एकवार मुलीकडं पाहिलं आणि परत ते गडाकडं पाहू लागले. मागं उभी राहिलेली सखू म्हणाली,
‘बाबा!’
‘काय?’
आईनं विचारलंय्, न्याहारी करतासा नव्हं?’
‘न्याहारी! पोरी, तुझ्या आईला न्याहारी सुचतीया. पण त्यो वाघ आत्ता ईल, नव्हं? घास करंल माझा!’
‘कोन वाघ?’ साखूनं विचारलं.
‘त्यो! बाजी परभू देशपांड्या! त्यो येनार हाय गडावर.’
‘कशापायी?’
विठोजीनं एक प्रदीर्घ सुस्कारा सोडला. मांडीवर थाप मारत तो म्हणाला,
‘कशापायी? भोग आपला! दुसरं काय? म्हनं, गड साफ-सूफ करून ठेवा. धा वर्सांत एक कुत्रं फिरकलं न्हाई. धा वर्सांत गडाला एक मालक ऱ्हायला न्हाई. ऱ्हायलो म्या! त्यो शिवाजी आला आनि गड बघून गेला आणि आता ह्यो येतूया.’
‘ईना! त्यो काय खातोय् काय?’
‘पोरी, तुला ठावं न्हाई! ह्यो देशपांड्या साधा न्हवं. बांदलांचा त्यो दिवान व्हता. बांदल मेल्यावर बांदलांची पोरं आनि बाजी शिवाजी राजाला मिळाली. आता त्याची नजर या ओस पडलेल्या गडावर गेली. येऊ दे. सवताच्या डोळ्यांनी बघू दे! गड कसला, डोंगरच झालाय् ह्यो! दोन-दोन मानसं राबत्यात, पन एक झुडूप हालंना.’
सखू काही न बोलता घरात गेली.
विठोजी बोलत होता, त्यात काही खोटं नव्हतं. जासलोड गडाची अवस्था तीच होती.
काळाच्या ओघात सारे बुरूज ढासळले होते. तटांना खिंडारं पडली होती. गडावर आठ-दहा घरटी तग धरून राहिली होती. जुन्या वाड्याची पडझड होऊन फक्त जोती उरली होती. गडावर पाण्याचं टाकं तेवढं शाबूत होतं.
विठोजीचं लक्ष गडाच्या दरवाज्यातून येणाऱ्या भैरु न्हाव्याकडं गेलं. भैरु आजूबाजूला बघत विठोजीच्या घरट्याकडं येत होता. कुऱ्हाडी घेतलेली माणसं नको असलेली झाडं तोडत होती. कुदळीनं झुडपं उपसत होती. ते पाहत भैरु चालत होता.
भैरु विठोजीच्या घराजवळ येताच त्याचं लक्ष कट्ट्यावार बसलेल्या विठोजीकडं गेलं.
विठोजीला पाहताच भैरु भरभर पावलं टाकीत विठोजीजवळ गेला, लवून मुजरा करीत तो म्हणाला,
‘मुजरा, सरकार!’
‘सरकार गेला खड्ड्यात!’ विठोजी उसळला. ‘दोन दिस झालं सांगावा धाडून, आनि आज उगवलास?’
‘न्हाई, धनी! तसं म्या करीन व्हय?’ भैरु आपली धोकटी उलगडत म्हणाला, ‘त्याचं काय झालं…’
भैरुला थांबवत विठोजी म्हणाला,
‘काही सांगू नगंस. लवकर काम कर.’
करतो की!’ भैरु म्हणाला, ‘पन ऐकशीला तर खरं! त्याचं काय झालं…’
विठोजीनं सुस्कारा सोडला, आणि तो नाइलाजानं ऐकू लागला.
भैरु उघड्या मांडीवर वस्तरा घासत सांगत होता,
‘धनी, तुमचा सांगावा आला, आनि सांजंला कारभारीण म्हणाली, ‘घरला गाय आली न्हाई. आला का भोग! रातीचं कुठं जानार! म्हनालो, बघू सकाळी! काय करायचं, धनी. परपंच करु नव्हं. आयला, कारभारीन नागिनीवानी डाफारली. गाईची पाडी घरात हाय आनि गाय न्हाई. आई विना पाडी जगंल काय?’
भैरुचा वस्तरा विठोजीच्या गालावरुन फिरत होता. विठोजीला हसण्याची उबळ आली आणि क्षणात तो ओरडला,
‘अरं, कापलं.’
‘धनी, तुमीच हसलासा.’ भैरु मख्खपणे म्हणाला.
भैरु पाणि लावून विठोजीची दाढी करीत होता. पण विठोजीला उत्सुकता होती. न राहवून त्यानं विचारलं,
‘मग सापडली गाय?’
‘न सापडायला काय झालं? म्या येरवळी उठून मागं लागलो. हिंडा बरोबर चरायला गेलेली गाय जानार कुठं? लई रान फिरलो, तवा देववाडीच्या हिंडात गाय गेली, म्हनून सुगावा लागला.’
‘आनि?’
‘आनि काय! सरकार, देववाडीच्या पाटलाच्या गोठ्यात माझी गाय.’
‘मग?’
‘म्या पाटलाला सांगितलं, गाय माझी हाय, म्हनून. तर त्यो म्हनला कसा, तुझी गाय कशावरनं? पुरावा आन!’
‘आयला, लईच बिलंदर दिसतूया.’ विठोजी दुसरं गालफड पुढं करीत म्हणाला, ‘मग?’
‘मग! म्या सांगितलं. म्हनालो, गाय माझी. घरात तिची पाडी हाय. तुमीच सांगा गाय माझी, म्हनून!’
त्या कथेनं विठोजीचं भान हरपत होतं. दाढीकडं त्याच लक्ष राहिलं नव्हतं.
‘आनि, रं s’ विठोजीनं विचारलं.
‘काय सांगू, धनी! म्या नुसतं म्हनालो आनि त्यो पाटील नागावानी उभा ऱ्हायला. आपल्या चाकरांस्नी बोलावलं. वरडला, ‘ह्या भडव्याची पाट सोला s’ सांगतो मालक. माझं बळ सरलं. उसनं अवसान धरुन मी म्हनालो, तुमी धनी. माझी कवाबी पाट सोला. पन त्याचा काय इचार व्हईल?’
‘कसला इचार?’
‘शिवाजी राजे जवा रोयड्या गडावर गेलं व्हतं, तवा मला भेटलं व्हतं. शिवाजी राजाचा गडी हाय मी. तेंच्या कानांवर ही गोष्ट गेली, तर तुमी कुठं ऱ्हाशीला?’
‘असं तू म्हनालास?’
‘धनी, मेल्या कोकराला आगीचं भ्या कसलं? म्या निक्तं शिवाजीचं नाव काढलं आनि पाटलाची फना साफ दुमडली. नांगा खाली पडला. गोठ्यातली गाय आपसूक सोडून दिली.’
विठोजीची दाढी झाली होती. गालावर आग पसली होती. दाढीवरुन हात फिरवत विठोजी म्हणाला,
‘भैरु, तुझ्याजवळ झाड सोलायची तासणी हाय?’
‘हाय की, धनी!’ भैरुनं उत्तर दिलं.
‘पुढच्या वक्ताला तीच तासणी घेऊन ये.’
‘का जी?’
‘तुझ्या वस्तऱ्यापरीस तीच बरी! त्यानंच दाढी कर.’ विठोजी म्हणाला.
भैरुला त्या बोलण्याचं काही वाटलं नाही. चेहऱ्यावरचं हासू लपवत तो म्हणाला,
‘धनी, आता मागचं लव्हार ऱ्हायलं न्हाईत. वस्तऱ्याला पानी कोन देनार! मागिंदी शहाजी राजांचं राज होतं, तवा इमान पन व्हतं. तुमांस्नी ठावं हाय. दाढी कराय लागलो, तर नीज यायची मानसाला. गेलं ते दिस. धनी, जरा तेल आनाय सांगा.’
‘कसलं तेल?’
‘खोबऱ्याल! लई दिसानं आलु तवा जरा मालीश करून जातो.’
‘गुमान गावची वाट धर! अरं भैरु, ते दिस गेलं आता. दिवाळीला टाळूला तेल लागायची मारामार झालीय, बग.’ गालफडाची आग विसरून विषय बदलत विठोजी म्हणाला, ‘खरचं, तू शिवाजीला भेटला व्हतास?’
‘म्या! आनि शिवाजीला!’ भैरु हसत उद्गारला, ‘धनी, जवा हत्ती रस्त्यात येतो, का न्हाई, तवा उंदरानं बीळ जवळ करावं!’
‘विठोजी मनमोकळेपणानं हसला.
आपली दाढी खाजवत भैरु म्हणाला,
‘धनी!’
‘काय?’
‘आवंदा बलुतं मिळालं न्हाई.’
‘अरं, पिकलंच न्हाई, तर बलुतं देनार कसं?’
‘मग गरिबानं जगावं कसं, जी?’
‘थांब! रडू नगंस.’ विठोजीनं घरात बघत हाक दिली, ‘अरं, कोन हाय तिकडं?’
काही क्षणांत सखू दारात आली. भैरुला बघताच तिनं पदर सावरला. सखूला बघून भैरुनं मुजरा केला.
‘अक्कासाब कवा आल्या?’ भैरुनं विचारलं.
‘झालं आठ दिस! माहेरपनाला आनलीया.’ आणि सखूकडं वळून विठोजी म्हणाला, ‘पोरी, याला सा शेर नाचणं घाल.’
‘सा शेर?’ भैरु उद्गारला.
‘बरं बरं! सा पायली दे! झालं?’
‘व्हय, जी!’
विठोजी घरात जाण्यासाठी उठला आणि एकदम वळला.
‘बरी आठवण झाली, बग! अरं भैरु, बेलदार मिळतील?’
‘बेलदार? कशापायी?’
‘वाडा बांधायचा हाय माजा! अरं, त्यो बाजी गड बांदनार हाय, म्हनं. मग बेलदार लागनार. कुंभार लागनार.’
‘हत् तिच्या! त्यांस्नी काय तोटा! आमची देववाडी, मुरूडवाडी त्यांनीच भरलीया नव्हं! माश्या मारत बसल्यात. कवाबी सांगावा धाडा. मुंग्यागत रीघ लागंल गडावर.’
भगभगणाऱ्या दाढीला गोडं तेल लावून विठोजीनं परसातल्या दगडावर आंघोळ आटोपली.
विठोजी भर उन्हात गड फिरत होता.
गडाची जागा आता बरीच मोकळी झाली होती. विठोजी गडाच्या तटाकडं गेला. तटावरून तो पाहत होता. गडाच्या पायथ्यापासून तटापर्यंत दाट रान वाढलं होतं. ते अफाट रान बघून विठोजीचं मन उदास झालं. तो वैतागानं स्वतःशीच पुटपुटला,
‘माझा बा यायला पायजे, ह्यो गड मोकळा करायला! सांगाय काय जातं!!’
त्या विचारानं काळजीत पडलेला विठोजी घरची वाट चालू लागला.
*🚩 क्रमशः 🚩*