1984 च्या 14 एप्रिल या शुभदिनी, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. दिल्ली महानगराच्या पूर्वी भागातल्या तसेच साहिबाबाद, गाजियाबाद, नोएडा, शालीमार बाग, सूर्यनगर, रामप्रस्थ इत्यादि भागांत राहणाऱ्या मराठी बांधवांची सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक तहान शमविण्याकरीता पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ ह्या पाणवठयाची स्थपना झाली.
ह्या भागांत राहणारे सर्वश्री साठे, मुळे, सावलकर, टिकेकर, परांजपे, मटंगे, रास्ते, जेजुरीकर, मुखेडकर, तांबे, गोगटे, देशपांडे इत्यादि मंडळी या शुभकार्यात सहभागी होती.
वात्सल्यातून 25 वर्षाच्या तारुण्यात प्रवेश करतांना मंडळानी खूप नवीन आणि ऊँच टप्पे गाठले आहेत. आमच्या उत्साही आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ विविध क्षेत्रात आपली छाप पाडत आहे.
सांस्कृतिक क्षेत्रांत मंडळाने 1999 पासून पदार्पण केले आणि रंगमंच्यावर प्रसिघ्दि गाठावयास सुरवात केली. 1999 मध्ये ''साडी उडाली आकाशी'', 2000 मध्ये ''बडे बापके बेटे'' व ''आजचा संसार'', 2001 मध्ये ''विठ्ठल तो आला आला'' अश्या एकांकीका सादर केल्या. आणि त्याच वर्षी म्हणजे 2001 पासून दिल्लीत होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मराठी नाटय स्पर्धेत पण भाग घ्यायला सुरवात केली. 2001 मध्ये ''मी माझ्या मुलांचा'', 2002 मध्ये ''आई रिटायर होतेय'', 2003 मध्ये ''नाती गोती'', 2004 मध्ये ''उद्या कॉलेज बंद राहील'' आणि 2005 मध्ये ''मित्र'' अशी विविध विषयांवर आधारीत नाटकांची मंचने मंडळाने केली.
ह्यात भाग घेतलेल्या कलाकारां मध्ये उत्कृष्ट प्रौढस्त्रीच्या भूमिके साठी तसेच उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीच्या भूमिके साठी डॉ (सौ) रेजिना मुळे पारख, उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीच्या भूमिके साठी सौ. स्वप्नगंधा जोशी, उत्कृष्ट प्रौढ पुरूषाच्या भूमिके साठी पुरूषोत्ताम करंजगांवकर, उत्कृष्ट विनोदी भूमिके साठी सुहास बेंद्रे आणि परिक्षकांचे विशेष पारितोषिक अभिषेक करंजगांवकर यांनी पटकाविले.
त्याच बरोबर कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ह्या नाटकांच्या कलाकारांना दिल्लीतच नव्हे तर महाराष्ट्र शासना तर्फे नागपूर येथे गौरवांवित करण्यात आले. त्यामघ्ये प्रशांत साठे, डॉ. डी. बी. पारख, श्रीकांत करंजगांवकर, डॉ (सौ.) रेजिना मुळे पारख व विश्वास ढमढेरे होते.
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली, हे १९८४ पासून दिल्लीत गणेशोत्सवा व्यतिरिक्त सांस्कृतिक व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. मंडळाने सामुहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम पण मोठया प्रमाणात दिल्लीत आयोजित केला होता. मंडळाने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर २००४ पासून “वधू-वर सूचक” मंडळाची स्थापना केली आहे. दिल्ली व दिल्लीच्या जवळील शहरं उदा. गुडगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गाझियाबाद ही आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या संपन्न झालेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रियन परिवार नोकरी/व्यवसाय/शिक्षणाच्या निमित्ताने आज येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी आपल्या उपवर मुला मुलींसाठी उपयुक्त वधू-वराची माहिती मिळविणे कठीण झाले आहे ह्या सर्व अडचणी लक्षात घेउन मंडळाने “वधू-वर सूचक”मंडळाची स्थापना केली आहे. आज वरील शहरां व्यतिरिक्त गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश बिहार इत्यादि प्रदेशातून पालक आपल्या उपवर मुलां व मुलींचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळात रजिस्ट्रेशन करीत आहेत.
आता मंडळाने सामाजिक काय देखील करयास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने मंडळाने मागील काही वर्षांपासून रक्त दान शिबिराचे आयोजन करणे सुरु केले आहे. ह्या शिबिरात मंडळाच्या उत्साही सभासदांनी रक्त दान करून ह्या सामाजिक कार्यास हात भार लावला.